बुद्धिबळाच्या पटासह शिक्षणाच्याही मैदानावर 'ती' ठरली अव्वल

International chess player Mridul Dehankar success in Xth Examination
International chess player Mridul Dehankar success in Xth Examination

नागपूर  : वर्षभर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांच्या निमित्ताने ती घराबाहेर राहायची. त्यामुळे ना शाळेत जायला वेळ मिळायचा, ना अभ्यासाला. तरीही तिने दहावीच्या परिक्षेत नव्वद टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळवून बुद्धिबळाच्या पटासह शिक्षणाच्याही मैदानावर अमिट छाप सोडली. ही प्रेरणादायी कहाणी आहे उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू मृदुल डेहनकरची. 

भवन्स विद्‌यामंदिरमध्ये (त्रिमुर्तीनगर शाखा) शिकणाऱ्या मृदुलने बुधवारी जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या निकालात 93.8 टक्‍के गुण पटकावून दोन्ही आघाड्यांवर बाजी मारली. 16 वर्षीय मृदुल कधीच "पुस्तकी किडा' नव्हती. वर्षभर स्पर्धांच्या निमित्ताने इकडून तिकडे सारखी भटकंती करावी लागल्याने, तिला शाळेसह अभ्यासालाही वेळ मिळत नव्हता. मात्र परिक्षेपूर्वी अवघा महिनाभर प्रामाणिकपणे अभ्यास केल्याने ती हे घवघवीत यश मिळवू शकली. 

उल्लेखनीय म्हणजे, शिकवणी वर्ग न लावता तिने हे गुण मिळविले. मृदुल आंतरराष्ट्रीय खेळाडू असली तरी, आईप्रमाणे तिलाही संगणक क्षेत्रातच करिअर करायचे आहे. मृदुलची आई (अर्चना) प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्‌यालयात संगणक शाखेच्या प्रोफेसर आहेत. तर वडील (विलास) एमएसईबीमध्ये कार्यकारी अभियंता आहेत. 

राष्ट्रीय व आशियाई चॅम्पियन असलेल्या मृदुलने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसह जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. या स्पर्धांमध्ये 11 सुवर्णांसह 25 पदकांची कमाई केली. तसेच ग्रीस, थायलंड, उरुग्वे, जॉर्जिया, मंगोलिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, सिंगापूर, संयुक्‍त अरब अमिरातमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी मिळाली.

तिने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय महिला मास्टर किताब जिंकला. जागतिक ज्युनियर रॅंकिंगमध्ये तिने दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचा अनोखा पराक्रमही तिने केला. सर्वात महत्वाचं म्हणजे, भारताचा महान बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंदने तिच्या खेळाचे भरभरुन कौतुक केले. 

 
अन्य खेळाडूंचीही गरुडझेप 


शहरातील इतरही खेळाडूंनी दहावीच्या परिक्षेत उल्लेखनीय यश मिळवून आपले अष्टपैलूत्व सिद्‌ध केले. अजय दयाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या विनिल मोखाडेने 99 टक्‍के, देवेश जेना व सार्थक पाखमोडेने प्रत्येकी 96.4 टक्‍के, कृष्णा चिन्नामिंदपुरेने 90 टक्‍के, आरव फर्नांडीसने 87.2 टक्‍के, युगांधर देवने 86.4 टक्‍के, जय पालकरने 82 टक्‍के आणि लोकेश गिडवानीने 80 टक्‍के गुण प्राप्त केले. याशिवाय चेतक खेडीकर यांच्या नेतृत्वाखालील सेंटर पॉइंट दाभाची बुद्धिबळपटू उत्सवी गोहिलने 98 टक्‍के, क्रिकेटपटू अनिमेश शर्माने 97.4 टक्‍के, टेनिसपटू मयंक मुखर्जीने 96.6 टक्‍के, फुटबॉलपटू आदित्य सारडाने 96.2 टक्‍के व तन्वी चांडकने 96 टक्‍के, बॅडमिंटनपटू तनिषा संगतानीने 95.8 टक्‍के, फुटबॉलपटू रीत दाराने 95.6 टक्‍के, आदित्य शरणने 95.2 टक्‍के, जलतरणपटू साहिल कळंबेने 94.8 टक्‍के, फुटबॉलपटू आदित्य ठाकूरने 93.6 टक्‍के, बास्केटबॉलपटू खुशाल अग्रवालने 93.2 टक्‍के, आदित्य शर्माने 92.6 टक्‍के, फुटबॉलपटू प्रतीक वाळकेने 91.8 टक्‍के, ऍथलिट दिया राठीने 91 टक्‍के व फुटबॉलपटू सान्या बोसने 90.4 टक्‍के गुण मिळविले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com