Video : धन्यवाद, आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत; न्यायालयानेही केले कौतुक, कोण आहेत 'ते'?

अनिल कांबळे
सोमवार, 25 मे 2020

मजुरांचे कॅम्प तयार करणे, त्यांचे जेवण, स्वच्छ पाणी, निवासाची व्यवस्था तसेच त्यांच्या मनोरंजनासह फिटनेसवरही डॉ. भरणे यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळे नागपूर शहरातील कोणत्याही ठिकाणावरून मजुरांच्या कोणत्याच प्रकारच्या तक्रारी आल्या नाहीत.

नागपूर : देशात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित होताच पोलिस यंत्रणेवर कमालीचा ताण पडला. पोलिसांनीही जिवाची बाजी लावून आतापर्यंत कोरोनाविरुद्ध लढा दिला. मात्र, कोविड योद्धांचे सरसेनापती म्हणून नागपूर शहर पोलिस दलातील अप्पर पोलिस आयुक्‍त डॉ. नीलेश भरणे यांनी आतापर्यंत अविरत सेवा देऊन पोलिस विभागात एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. 

कोरोनाचा धोका पाहता 21 मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू झाली. त्यामुळे सर्वच कारखाने, कंपन्या, उद्योग-व्यवसाय आणि शासकीय-निमशासकीय कार्यालयेसुद्धा बंद झाले. यामध्ये भरडला गेला तो मजूर आणि कामगार वर्ग. देशातील सर्वच राज्यात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन जगण्याचा मोठा प्रश्‍न समोर आला. त्यांना दोन वेळचे जेवण आणि राहण्याची सुविधा करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज पडली.

हेही वाचा - होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

मजुरांनीही आपापल्या राज्यात परतण्याची घाई केली. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर बंदोबस्त आणि व्यवस्था असा दुहेरी ताण वाढला. नागपूर शहर पोलिस दलात गुन्हे शाखेच्या अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍तपदी असलेले डॉ. नीलेश भरणे पहिल्या दिवसापासून नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेसह कोरोनासंबंधीच्या सर्वच प्रकारच्या तक्रारींसाठी स्वतः झटले. प्रत्येक मजुराच्या तक्रारीचे समाधान स्वतःहून करण्यास प्रारंभ केला. 

मजुरांचे कॅम्प तयार करणे, त्यांचे जेवण, स्वच्छ पाणी, निवासाची व्यवस्था तसेच त्यांच्या मनोरंजनासह फिटनेसवरही डॉ. भरणे यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळे नागपूर शहरातील कोणत्याही ठिकाणावरून मजुरांच्या कोणत्याच प्रकारच्या तक्रारी आल्या नाहीत.

डॉ. भरणे यांनी शहरातील जवळपास 160 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवकांचे गट, सेवाभावी संस्था तसेच दानदात्यांच्या मदतीने धान्याच्या किट, फूड पॅकेट्‌सचे शहरातील झोपडपटट्यांसह खेड्यापाड्यात वितरण केले. मजूर, निराश्रित आणि गरजूंना दोन वेळेसचे पोटभर अन्न मिळाले तसेच कुटुंबीयांना पुरेल तेवढे धान्यही पोलिसांनी वितरित केले.

अधिक माहितीसाठी - अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृत महिलेने केली हालचाल, अन्‌ पुढे....

पायी जाणाऱ्यांना दिलासा

आपापल्या राज्यात पायी निघालेल्या मजूर आणि कामगारांना डॉ. नीलेश भरणे यांनी शहरातील चारही बाजूला चेकपोस्ट उभारून जेवण, पाणी आणि नाश्‍त्याची व्यवस्था केली. एवढेचे नव्हे तर ज्या मजुरांच्या पायात चप्पल नाही, अशांना चप्पल आणि कपडे दिले. नागपूर सीमेवरून अन्य राज्यात जाणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांना औषधोपचारही डॉ. भरणे यांनी मिळवून दिले. 

तिकीट आणि प्रवासास मदत

शेवटच्या टप्प्यात श्रमिक ट्रेन धावल्यामुळे पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला. शहरात असलेल्या परप्रांतीय मजुरांची संख्या आणि नावाची नोंदणी करणे, त्यांची तिकीट काढणे तसेच त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करून त्यांना रेल्वे स्थानकावर पोहोचविण्यापर्यंतचे काम डॉ. भरणे यांच्या पथकाला करावे लागले. पहाटे पाच वाजतापासून तर रात्री एक वाजेपर्यंत डॉ. भरणे हे पायाला चाके लागल्यासारखे मदतीसाठी धावत होते. 

चेहऱ्यावर आनंद आणि हास्य

पहाटेच्या सुमारास रेल्वेत मजुरांना बसवून दिल्यानंतर त्यांना प्रवासात भूक भागेल एवढे अन्न, नाश्‍ता, बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या पोहोचविण्यासाठी डॉ. भरणे स्वतः रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्मवर धावताना दिसले. कुणाला नात्याची प्लेट नेऊन देताना तर कुणाच्या हातात बिस्किटांची पाकिटे देताना त्यांची तारांबळ उडत होती. यासोबतच भरणे यांनी काही गरीब कुटुंबीयांना चार पैसेही हातात देऊन घरी पोहोचल्यानंतर चार दिवस जेवणाची व्यवस्था करून दिली.

क्लिक करा - अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

पोलिस कर्मचाऱ्यांनाही सूचना

गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांची मोठी फळी निर्माण केली. मात्र, दुसऱ्यांना मदत करताना स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांना सूचना देणे, मास्क, सॅनिटायझर वापरण्याची सक्‍ती करणे तसेच मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी यादरम्यान केले. कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन होऊ नये म्हणून त्यांनी सर्वोतोपरी काळजी घेतली. 

न्यायालयाने घेतली दखल

राज्यभरात श्रमिकांची स्थिती हलाखीची असताना केवळ नागपुरातील श्रमिकांची योग्य ती व्यवस्था डॉ. भरणे यांनी केली. त्यांच्या या कार्याची दखल थेट उच्च न्यायालयाने घेतली. न्यायमूर्तींनी डॉ. भरणे यांच्या कार्याचा उल्लेख करीत कौतुक केले. डॉ. भरणे यांच्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा उजळली तसेच पोलिसांचा आदर वाढला आहे. 

कुटुंबालासुद्धा वेळ देता आला नाही
नागरिकांची सेवा करण्यासाठी खाकी वर्दी अंगावर चढवली आहे. समाजाची सेवा करण्याची मोठी संधी कोरोनादरम्यान मला मिळाली. त्यामुळे प्रत्येकाची समस्या जाणून घेत ती सोडविण्यासाठी अडीच महिन्यांपासून धडपड करीत आहे. श्रमिकांवर दुर्लक्ष होऊ नये म्हणून माझ्या कुटुंबालासुद्धा वेळ देता आला नाही. मात्र, घरी पोहोचलेल्या अनेक मजुरांचे फोन, मॅसेज मला रोज येतात. धन्यवाद आणि आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत. त्यांना केलेल्या मदतीचे यापेक्षा मोठ समाधान कोणतेच नाही. 
- डॉ. नीलेश भरणे,
अप्पर पोलिस आयुक्‍त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS Nilesh Bharne uninterrupted service for two and a half months