हिवाळी अधिवेशन न घेतल्याने किती पैसे वाचणार; अनंत कळसे यांनी विचारला प्रश्न

अतुल मेहेरे
Tuesday, 22 September 2020

धान, सोयाबीन, कापूस, संत्रा असे एक ना अनेक विदर्भातील प्रश्‍न अधिवेशनात मार्गी लागले आहेत. यासाठी विदर्भाला पॅकेज दिले गेले आहे. निधीची तरतूद केली गेली आहे. प्रस्ताव आणि ठरावांच्या माध्यमातून प्रश्‍नांची सोडवणूक होते. त्यामुळे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणे अत्यावश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

नागपूर : दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन यावर्षी न घेता होणारा खर्च कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. परंतु, नागपूर करारानुसार आणि संसदीय परंपरेच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशन नागपुरात होणे आवश्‍यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘साकळ’शी बोलताना सांगितले.

यापूर्वीही बरेचदा असे प्रश्‍न विचारले गेले आहेत की, नागपूर अधिवेशनाचा खर्च विदर्भाला द्या. त्यातून विदर्भाचा विकास होईल. पण, या मागणीत काही तथ्य नाही. केवळ अधिवेशनाचा खर्च मिळवून विदर्भाचा विकास होणार नाही. गेल्या ४० वर्षांपासून याच अधिवेशनात विदर्भाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागलेले आहेत.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

धान, सोयाबीन, कापूस, संत्रा असे एक ना अनेक विदर्भातील प्रश्‍न अधिवेशनात मार्गी लागले आहेत. यासाठी विदर्भाला पॅकेज दिले गेले आहे. निधीची तरतूद केली गेली आहे. प्रस्ताव आणि ठरावांच्या माध्यमातून प्रश्‍नांची सोडवणूक होते. त्यामुळे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणे अत्यावश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नियमाप्रमाणे कामकाज चालते. यामध्ये नियमांनुसार प्रश्‍न दिले जातात. सरकारच्या प्रत्येक विभागात प्रश्‍नांची संख्या जर बघितली तर त्यामध्ये विदर्भाचे प्रश्‍न असतात. फक्त ते बॅलेटमध्ये आले पाहिजे, स्वीकृत झाले पाहिजे, हे महत्वाचे आहे. विधिमंडळाचं काम राज्यासाठी आहे. लक्षवेधी सूचना आणि विविध ठराव विदर्भाच्या बाबतीत येत असतात.

हेही वाचा - प्यार दिवाना होता है! टिकटॅकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...

तारांकित प्रश्‍न, अल्पसूचना प्रश्‍न यांच्या माध्यमातूनही कामे होत असतात. नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरला होता आणि तो मार्गी लागतोय. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेऊ नये किंवा त्यावरील खर्च विदर्भाला द्यावा, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मत अनंत कळसे यांनी मांडले.

राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडवाणा विद्यापीठाची स्थापना निव्वळ ठरावांच्या माध्यमातून केली आहे. सभागृहात ठराव मांडल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला. याशिवाय काँग्रेस, शिवसेना आणि इतरही पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात केवळ ठरावांच्या माध्यमातून मोठमोठी कामे केलेली आहे. महाकाय गोसेखुर्द प्रकल्पसुद्धा विदर्भात साकारला गेला, ती सुद्धा अधिवेशनाची देण आहे, असे अनंत कळसे यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is imperative that the winter session be held in Nagpur