तुरुंग अधीक्षकांनी झडती घेताच थरथरू लागला कर्मचारी, नंतर समोर आली धक्कादायक माहिती

अनिल कांबळे
Thursday, 21 January 2021

बुधवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी कारागृहात घेण्यात आले. त्यांच्या वागणुकीवर तुरुंग अधीक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांची कसून झडती घेण्यात आली.

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरू आहे. कैद्यांना अंमली पदार्थ, ड्रग्स, अफिम, गांजा आणि दारूसुद्धा पोहोचविल्या गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. बुधवारी एका तुरुंग रक्षकाची अंगझडती घेताना चक्क ड्रग्स त्याच्याकडे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश मधुकर सोळंकी (२८, रा.सहकारनगर) असे आरोपी तुरुंग कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी कारागृहात घेण्यात आले. त्यांच्या वागणुकीवर तुरुंग अधीक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांची कसून झडती घेण्यात आली. त्यापैकी मंगेश सोळंकी हा झडती घेताना थरथरू लागला. त्याच्यावर जास्तच संशय बळावला. तुरुंग अधीक्षकांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली. मंगेशच्या पायातील मोज्यात कुठलीतरी पुडी आढळून आली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ होता. त्याची तपासणी केली असता कैद्यांच्या मागणीवरून ड्रग्स असल्याचे अधीक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मंगेशची प्राथमिक चौकशी केली. तो समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यामुळे त्याची धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मंगेशला धंतोली पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा - महिलेच्या घरात घुसून डोक्यावर ठेवली बंदूक अन् केली विचित्र मागणी; घटनेनं परिसरात खळबळ   

कारागृहात कुख्यात गुंड आणि ड्रग्सचा शौक असलेले गुंड बंदिस्त आहेत. त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. ते कारागृहातील तुरुंग रक्षकांना पैसे देण्याचे आमिष दाखवतात. त्याबदल्यात तुरुंगामध्ये दारू, गांजा, एमडी आणण्यास सांगतात. कैद्यांसाठी अंमली पदार्थ नेण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहे. पैशाच्या लालसेपोटी कारागृहात तुरुंग पोलिसच अंमली पदार्थ पोहोचवित असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

चिकन-मटन आणि केकही -
मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांना पैसे दिले की जवळपास सर्वच सोय होते. कैद्यांना दारू, मटन-चिकन, आणि कुण्या मोठ्या कैद्याचा वाढदिवस असला की केकही कारागृहात पोहोचविण्यात येतो. जो पैसा मोजेल त्याला सोयी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे या बाबींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jail employee provide drugs to prisoner in nagpur central jail