पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टीचा आरोप पुसण्यासाठी राष्ट्रवादीचा हा नेता निघाला विदर्भाच्या दौऱ्यावर

राजेश चरपे
Wednesday, 27 January 2021

राष्ट्रवादीच्या वतीने विदर्भात पक्षाच्या विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रफुल पटेल आणि अनिल देशमुख यांच्यावर याची जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्षांनीसुद्धा आपल्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातूनच करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील गुरुवारपासून (ता. २८) ‘राष्ट्रवादी परिवार संवादा’साठी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. सलग अठरा दिवस, १४ जिल्हे आणि ८२ मतदार संघात ते कार्यकर्त्यांसोबत थेट संवाद साधणार आहेत.

गडचिरोलीपासून संवाद दौऱ्याला प्रारंभ होत असून, एक आणि दोन फेब्रुवारीला नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या बैठका होतील. या दरम्यान नागपूर शहराच्या कार्यकारणीचीसुद्धा बैठक बोलावण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवेश प्रवक्ते तसेच दौऱ्याचे विभागीय समन्वयक प्रवीण कुंटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

आगामी महापालिकेच्या निवडणुका, विदर्भातील रखडलेले प्रकल्प, अडचणी जाणून घेत प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संवादाच्या माध्यमातून उत्साह निर्माण करणार आहेत. दौऱ्यात ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादीच्या वतीने विदर्भात पक्षाच्या विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रफुल पटेल आणि अनिल देशमुख यांच्यावर याची जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्षांनीसुद्धा आपल्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातूनच करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टी असे आरोप राष्ट्रवादीवर आहे. ते खोडून काढण्याचा प्रयत्न पाटील करणार आहेत.

अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

कुंटे समन्वयक

प्रदेशाध्यक्षांच्या संवाद दौऱ्यासाठी विभागीय समन्वयक म्हणून प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते विदर्भाच्या दौऱ्याचे नियोजन करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil will tour 82 constituencies in Vidarbha Political news