नाव करण, वय १७ वर्ष आणि धाडस बघाल तर आभाळा एवढा; कोणताही विचार न करता घेतली नदीत उडी

Karan saved the lives of both in Nagpur district
Karan saved the lives of both in Nagpur district

पारशिवनी (जि. नागपूर) : नदी, नाले, विहिरीत पोहण्याची अनेकांना हौस असते. मात्र, व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन पोहायला उतरल्यास कोणाचीच काही हरकत नसते. अनोळखी ठिकाणी असे धाडस करणे वेळप्रसंगी जीवावर बेतू शकते. असे प्रकार केल्याने घडलेल्या अपघाताच्या बातम्या आपण माध्यमांमधून वाचत असतो. असाच काहीसा प्रकार कन्हान येथील पिवळी नदीवर तीन अल्पवयीन मुलांसोबत घडला. मात्र, त्यांच्यापैकी दोघांसाठी करण गिवेले देवदूत ठरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास पिवळी नदी, नागपूर येथील तीन अल्पवयीन मुले कन्हान येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ फुटपाथवर स्वस्त बूट मिळतात म्हणून विकत घेण्यासाठी दुचाकीने कन्हानला आले. बूट खरेदी केल्यानंतर जवळच असलेल्या नदीवर पोहण्यासाठी गेले. तिघेही नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले.

यावर्षी आलेल्या पुरामुळे नदीमध्ये वाळूचे प्रमाण भरपूर वाढून ठिकठिकाणी विवर तयार झालेले आहेत. त्याचा अंदाज तिघांना न आल्याने पाण्यात उतरताच बुडायला लागले. त्यांनी आरडाओरडही केली. आवाज ऐकूण जवळपास क्रिकेट खेळत असलेली काही मुले त्यांच्याकडे धावली. करण गिवेले (१७, रा. सत्रापूर, कन्हान) याला पोहता येत असल्याने स्वःताच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली.

आयूष आशीष मेर्शाम (१५ वर्षे) व तेजस राजेश दहिवले (१६ वर्षे) दोघेही रा. पिवळी नदी, नागपूर यांना वाचविण्यात करणला यश आले. परंतु, विनयला वाचविता आले नाही. सर्वांनी कन्हान पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. लगेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. परंतु, अंधार झाल्याने काहीच करता आले नाही. विनयचे कुटुंबीयही कन्हान पोलिस ठाण्यात पोहोचले. परंतु, दुसऱ्या दिवशी शनिवारी त्याचे पार्थिवच सापडले.

नदीवर पोहायला जाणे टाळा

यावर्षी कन्हान नदीला धरणाचे जास्त पाणी सोडल्याने परिसरात सर्वत्र पूरग्रस्त परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे नदीमध्ये बरीच विवरं तयार झालेली आहेत. त्याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही. परिसरातील लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नदीवर पोहायला जाणे किंवा मिरवणुकींमध्येही नदी, नाल्याच्या पाण्याशी नाद करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी केले.

एकाला वाचविता न आल्याचे दुख

नदीत तीन युवक बुडत असल्याचे पाहून शेजारीच खेळत असलेल्या करणने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. तिघांमधील दोघांना वाचविण्यात तो यशस्वी झाला. पण, दुदैवाने एका वाचविण्यात तो अपयशी ठरला. याचे दुःख त्याला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com