खरेदी-विक्रीचा तिढा सोडविणार ‘खसरा ॲप’; मालमत्ता फसवणुकीची भीती संपणार

मंगेश गोमासे
Thursday, 15 October 2020

शहरात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभ होतील. यासाठी केवळ ॲपच नव्हे तर मयूरने संकेतस्थळ ही विकसित केले आहे. लवकरच त्याची ही संकल्पना मूर्त स्वरूपात येणार असून ते प्ले-स्टोअरवर टाकण्यात येणार आहे.

नागपूर : मालमत्तेची खरेदी-विक्री करणे ही सर्वात जास्त डोकेदुखीची बाब असते. सर्वसामान्यांना या व्यवहारातले फारसे कळत नसल्याने अनेकांची फसवणूक होते. अनावश्यक पैसेही लाटले जातात. हा सर्व प्रकार टाळून कागदपत्रांची कायदेशीर तपासणीसह मालमत्ता उपलब्ध करून देण्यासाठी मयूर माटे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने ॲपच्या माध्यमातून हे व्यवहार सोपे करण्यासाठी ‘खसरा’ नावाची संकल्पना मांडली आहे.

शहरात एखादा फ्लॅट, जमीन खरेदी करणे व भाड्याने घेणे ही बाब पाहिजे तितकी सोपी राहिली नाही. यासाठी अगोदर ती जागा असलेल्या मालकाचे कागदपत्रे योग्य आहे किंवा नाही, तसेच त्यात कुठला वाद आहे काय? याची बरीच माहिती घेणे आवश्यक असते. बरेचदा यातून ग्राहकांची फसवणूक होताना दिसून येते. याशिवाय दाखविलेली जागा योग्य आहे का? त्यातून घेण्याऱ्याची फसवणूक तर होत नाही, याची शहानिशा करावी लागते.

हेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

अनेकदा ऑनलाइन ॲपमध्ये दाखविण्यात आलेली जागा प्रत्यक्षात वेगळीच असल्याचे दिसून येते. या प्रकाराने रिअल इस्टेटमधील व्यवहार करताना अत्यंत सावधानता बाळगावी लागते. अनेकदा फ्लॅटचे चुकीचे फोटो दाखविले जातात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मयूर माटे या मेकॅनिकल शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने ‘खसरा’ संकल्पना मांडली आहे.

त्याने ‘बेलॅट्रिक’ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून त्याद्वारे ‘खसरा’ नावाचे ॲप विकसित करण्यावर भर दिला आहे. या ॲपद्वारे ‘गुगल मॅपिंग’चा उपयोग करून ज्यांना जमिनीची खरेदी व विक्री करायची आहे, त्यांना त्या प्रॉपर्टीचे नेमके लोकेशन, फ्लॅट व जमिनीचे ३६० डायमेंशन असलेले फोटो, तसेच व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची योग्य तपासणी कायदेशीर करून देण्यात येणार आहे. यामुळे शहरात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभ होतील. यासाठी केवळ ॲपच नव्हे तर मयूरने संकेतस्थळ ही विकसित केले आहे. लवकरच त्याची ही संकल्पना मूर्त स्वरूपात येणार असून ते प्ले-स्टोअरवर टाकण्यात येणार आहे.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

३६० डायमेंशन इमेज मिळणार
जमिनीची खरेदी आणि विक्री करताना अनेक समस्या येतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य लोकेशन आणि ३६० डायमेंशन इमेज मिळणार आहे. शिवाय मालमत्तेचे कागदपत्र कायदेशीर तपासून घेतल्याशिवाय त्याची माहिती ॲपवर टाकण्यात येणार नाही.
- मयूर माटे,
विद्यार्थी, जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khasra app to solve the problem of buying and selling