व्यावसायिकाच्या पत्नीला आला फोन, ‘बच्चे की सलामती चाहते हो तो ५० लाख का इंतजाम करो’

Kidnapping of businessman's son in Chhattisgarh
Kidnapping of businessman's son in Chhattisgarh

नागपूर : छत्तीसगडमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे आरोपींनी अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागितली आहे. त्यानंतर मात्र आरोपींना पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच मुलाला नागपुरात सोडले आणि पळ काढला. हा प्रकार आज उघडकीस आल्याची माहिती आहे. छत्तीसगड पोलिसांनी खासगी बसस्थानकावरून मुलाला ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील भिलाई शहरातील बलजितसिंह सेठीया एक पंजाबी हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांना गुरुप्रीत नावाचा मुलगा आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी गुरुप्रीत मित्रासह ढाब्यावर जेवायला गेला होता. दरम्यान, कारने आलेल्या आरोपींनी त्याचे अपहरण केले.

त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाच्या पत्नीला फोन केला. ‘बच्चे की सलामती चाहते हो तो ५० लाख रुपये का इंतजाम करो’ एवढे बोलून आरोपींनी फोन कट केला. राजनांदगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक वेगाने तपासाला लागले.

मुलाला घेऊन आरोपी थेट नागपुरात आले. पोलिस पाठलाग करीत असल्याची कुणकुण त्यांना लागली. त्यांनी मुलाला छत्तीसगडकडे जाण्यासाठी लागणाऱ्या बसस्थानकावर मुलाला सोडून दिले आणि पळ काढला. राजनांदगाव पोलिस आज नागपुरात पोहोचले. त्यांनी अपहृत मुलाला ताब्यात घेतले.

मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी रवाना झाले तर एक पथक नागपुरात आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींपैकी एक भिलाई पोलिसांना शरण आल्याची माहिती आहे. आयपीएल सट्टेबाजीतील पैशातून झालेल्या वादातून अपहरण झाल्याची माहिती आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com