उपराजधानीत गॅंगवॉर भडकले; आठ दिवसांत आठ खून

उपराजधानीत गॅंगवॉर भडकले; आठ दिवसांत आठ खून
उपराजधानीत गॅंगवॉर भडकले; आठ दिवसांत आठ खून

नागपूर : उपराजधानीत गॅंगवॉर भडकले आहेत. मागील आठ दिवसांपासून हत्याकांडाचे सुरू असलेले सत्र अद्याप संपलेले नाही. रविवारी सायंकाळी शहरातील कुख्यात गुन्हेगार बाल्या वंजारीचा निर्घृण खून करण्यात आला. जुने वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून घडलेल्या या थरारक हत्याकांडानंतर पारडीत एकच खळबळ उडाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. बाल्याचा खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, बाल्या ऊर्फ प्रदीप वंजारी (43) हा सुमारे दोन दशकांपासून गुन्हेगारी जगतात सक्रीय होता. पारडीतील मेहर मार्केट परिसरातील रहिवासी आरोपी नरेंद्र मेहर आणि रवी मेहर यांच्यासोबत भूखंड विक्रीच्या वादातून बाल्याचे शत्रुत्व निर्माण झाले होते. प्राप्त माहितीनुसार बाल्या सट्ट्याच्या व्यवसायात सक्रीय होता. शहरातील चर्चित गुन्हेगारांसोबत त्याचे संबंध होते. त्याचाच फायदा घेत तो पारडीत हफ्ता वसुलीही करीत असल्याची माहिती आहे.

त्याच्याविरुद्ध खुनाचे तब्बल चार गुन्हे दाखल असून, 2011 मध्ये मोक्काअंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय असल्याने त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धही करण्यात आले होते. पारडीसह पूर्व नागपुरातील सर्वाधिक चर्चीत असणाऱ्या दोन कट्टर विरोधक गुन्हेगारांसोबत त्याचे संबंध होते. यामुळे दोन्ही गट बाल्यावर चिडून होतेच. त्यातच नरेंद्रसोबतचही त्याचा वाद वाढतच चालला होता. 

वर्चस्व गाजविण्यासाठी बाल्या सतत नरेंद्रला जीवे मारण्याची धमकी देत होता. रविवारी सकाळी बाल्या काही समर्थकांसह नरेंद्रकडे गेला. शाब्दीक वादानंतर बाल्याने त्याच्या कानशिलात लगावली आणि आजच खून करण्याचा इशाराही दिला. हा अपमान सहन करीत नरेंद्रने माघार घेतली. पण, त्याच्या डोक्‍यात आग धुमसतच होती. सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास बाल्या पुन्हा नरेंद्रच्या कार्यालयात गेला. त्याला धमकावणे सुरू केले. नरेंद्रच्या डोक्‍यातही सनक गेली.

नरेंद्र, रवी तिथेच तळ ठोकून

बाल्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार करीत कार्यालयातील काठी उचलून त्याच्या डोक्‍यावर प्रहार केला. याबाबत माहिती मिळताच नरेंद्रचा भाऊ रवी आणि अन्य साथीदार घटनास्थळी पोहोचले. लाठी आणि डोक्‍यावर एकामागून फटके हाणत त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. घटनेनंतर अन्य आरोपी पसार झाले. पण, नरेंद्र आणि रवी तिथेच तळ ठोकून होते. 

पारडीत तणाव

रविवारी पारडी बाजार असल्याने घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिस आणि गुन्हेशाखेचे पथकही पोहोचले. त्यानी दोन्ही आरोपींना अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com