प्रेयसीच्या घरी घुसून घातली लग्नाची मागणी; वडिलांनी ऐटीत नकार दिला खरा, मात्र घडला पुढील प्रकार

अनिल कांबळे
Thursday, 14 January 2021

बुधवारी रात्री आठ वाजता प्रेयसीच्या घरी गेला. त्याने तिच्या वडिलांची भेट घेतली. ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे... तिच्याशी लग्न करायचे आहे.’ अशी बोलत लग्नाची मागणी घातली. त्यामुळे मुलीच्या वडिलाने चिडून त्याला ‘तू घराबाहेर निघ...’ असे बजावले.

नागपूर : प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या वडिलांना लग्नाची मागणी घातली. लग्नास नकार दिल्यामुळे थेट वडिलांवर प्रियकराने चाकूने हल्ला केला. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गौरव ठाकूर (रा. पारडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीडित युवती दोन बहीण व वडिलांसह राहते. ती बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे गौरव ठाकूरसोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध आहे. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या तसेच मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कातही राहत होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण युवतीच्या घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे तिच्या बहिणी आणि वडिलांनी तिचे घराबाहेर निघणे बंद केले.

अधिक माहितीसाठी - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

तसेच तिच्याकडून फोनही हिसकावून घेतला. त्यामुळे तिचा प्रियकर गौरव चिडला. त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीकडून तिची चाहूल घेतली. तिला घरी होत असलेला त्रास त्याला असह्य झाला. त्यामुळे तो बुधवारी रात्री आठ वाजता प्रेयसीच्या घरी गेला. त्याने तिच्या वडिलांची भेट घेतली. ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे... तिच्याशी लग्न करायचे आहे.’ अशी बोलत लग्नाची मागणी घातली. त्यामुळे मुलीच्या वडिलाने चिडून त्याला ‘तू घराबाहेर निघ...’ असे बजावले.

मात्र, तो घराबाहेर निघायला तयार नव्हता. प्रेयसीच्या वडिलाने धक्के देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीमागे लपविलेला चाकू काढला आणि ठार मारण्याची धमकी दिली. प्रेयसीच्या वडिलाने त्याला लग्नास नकार देताच चाकूने हल्ला केला. वडिलाच्या मांडीवर आणि हाताला वार लागल्याने ते जखमी झाले.

जाणून घ्या - सामान्य शेतकऱ्याची बायको ते महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, वाचा कोण आहेत संध्या सव्वालाखे

त्याला बळजबरीने बाहेर काढल्यानंतर त्याने दरवाज्याला लाथा मारल्या आणि दरवाजा दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर गौरव पळून गेला. याप्रकरणी प्रेयसीच्या बहिणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on sweetheart's father in Nagpur Crime marathi news