काय सांगता! नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास 

अथर्व महांकाळ
Saturday, 12 September 2020

नागपूरची शान असलेल्या निसर्गरम्य अंबाझरी तलावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तलावाचा इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या.    

नागपूर : आपण ज्या शहरात राहतो, जगतो आणि लहानाचे मोठे होतो त्या शहराबद्दल थोडी का होईना माहिती असायला हवी असे म्हणतात. आपल्यापैकी अनेकांना भरपूर माहिती असेलही. मात्र ज्या अंबाझरी तलावाच्या 'ओव्हरफ्लो'मध्ये अनेक जण धमाल मजा-मस्ती करायला जातात. अशा नागपूरची शान असलेल्या निसर्गरम्य अंबाझरी तलावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तलावाचा इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या.    

अंबाझरी तलाव हा नागपुरातील काही मोठ्या तलावांपैकी एक आहे. नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. नागपुरातून वाहणारी नाग नदी या तलावातून उगम पावते.

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 

या तलावाचे पूर्वीचे नाव 'बिंबाझरी' असे होते.  नागपूरच्या गोंड राजाच्या शासनादरम्यान या तलावाची निर्मिती झाली. त्यासाठी, नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. उत्तर भारतातून नागपुरात या कामासाठी आलेल्या 'कोहळी' समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केला. 

त्यानंतर भोसले घराण्याच्या शासनकाळात या तलावात अनेक सुधारणा केल्या गेल्या. नंतर सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटाने आणि  क्षमता तिपटीने वाढवण्यात आली. सन १८७० साली नागपुरात महानगर पालिका आली. तिने एक प्राथमिक कार्य म्हणून, शहरात या तलावातून घरोघरी पाणीपुरवठ्यासाठी नळयोजना अंमलात आणली.

...म्हणून नाव अंबाझरी

सन १८७० मध्ये भोसल्यांच्या काळात, मातीचे धरण बांधून निर्माण केलेल्या या कृत्रिम तलावातून त्याकाळचे सरदार, अधिकारी वर्ग इत्यादींना खापराच्या(माती भाजून तयार केलेल्या) नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. या तलावासभोवताली आंब्याची झाडे होती म्हणून यास अंबाझरी हे नाव पडले, असे म्हणतात. 

होत होता पाणीपुरवठा

या तलावाने पूर्वी सलग सुमारे ३० वर्षे नागपूर शहरास पाणीपुरवठा केला आहे. यातील पाणी सध्या प्रदूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यानंतर, शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे व पाण्याचे इतर स्रोत उपलब्ध झाल्यामुळे या तलावातून पाणीपुरवठा करणे बंद झाले. मात्र, येथून जवळच असलेल्या हिंगणा औद्योगिक परिसरास या तलावातील पाणी अजूनही पुरविले जाते.

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

निसर्गरम्य उद्यानही   

या तलावाशेजारीच एक उद्यान आहे. हे उद्यानही याच तलावाच्या नावाने ओळखले जाते. या बगिच्यात विविध प्रकारची झाडे आहेत. येथे पूर्वी तलावात बोटिंगची सोय होती. मात्र आता तलावाचे पाणी गढूळ झाल्यामुळे तसेच पाण्याची  पातळी वाढल्यामुळे बोटिंग बंद करण्यात आले आहे.  हे उद्यान सुमारे १८ एकर जागेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know the history of a lake which has the origin of a river