रक्षकच बनले भक्षक! मोठ्या प्रमाणावर होतेय वाळूची तस्करी; मात्र पोलिसांचे डोळे उघडता उघडेना 

 Large scale sand smuggling is going on at nagpur district
Large scale sand smuggling is going on at nagpur district

कोदामेंढी (जि.नागपूर) : मौदा तालुक्यात वाळूमाफियांचे खूप मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. नियम वेठीस घालीत खुलेआम सुरनदीच्या पात्रातून जेसीबी आणि पोकलँड मशीनद्वारे वाळूचे उत्खनन सुरु आहे. याकडे महसूल आणि पोलिस विभागाने मुद्दाम डोळे असूनही आंधळ्याचे सोंग केले आहे. जनतेचे  आणि शासकीय मालमत्तेचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी महसूल आणि पोलिस विभागाकडे असते. मात्र ह्याच विभागाचे अधिकारी वाळू माफियांना आश्रय देत आपले हात ओले करून घेत असल्याने रक्षकच भक्षक झाल्याचे एकंदरीत चित्र मौदा तालुक्यातील झाले आहे. 

रॉयल्टी असल्याच्या नावाखाली सुरनदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु आहे. वाळूच्या धंद्यात सर्वच राजकीय पक्षाचे नेते सहभागी आहेत. जड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असून पांदण रस्त्याला नालीचे स्वरूप आले आहेत. रस्त्याची आणि पर्यावरणाची नासधूस करणारे राजकीय नेते असलेले वाळूमाफिया हेच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शासनाला करताहेत. हे न पचणारे आहे. 

जिल्हाधिकारी आणि उपविभागीय कार्यालयातून शेतीचा उठाव आणि शेततळे खोदकाम करण्याकरिता परमिशन दिल्या जात आहे. मात्र ते उत्खनन  कुठून होते आणि नियमानुसार होते कि नाही याची चाचपणी करण्याची सौदार्य महसूल विभागाचे अधिकारी दाखवीत नाही. एक रॉयल्टी दाखवीत दिवसभर तीन ते चारदा वाहतूक केल्या जात आहे. 

त्याचबरोबर अधिकाऱ्यांची साथ असल्याने रात्रीला कुणाचा डरच नाही. सूर्य उगवणे आणि मावळण्याच्या वेळेत खोदकाम आणि वाहतूक करणे अनिवार्य असते. मात्र नियम तुडवीत रात्री बेरात्री खोदकाम आणि वाहतूक सुरु असल्याने ग्रामस्थांची रात्रीची झोप हराम झाली आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, पोलीस आणि महसुलचे अधिकारीच यात गुंतले असल्याने दाद मागावी कुणाकडे असाही सवाल आम जनतेचा आहे. 

तालुक्यात सुरनदीचे खूप मोठे पात्र विस्तारलेले आहे. नदी काठावरील शेतीचे भाव आजच्या घडीला गगनाला भिडले आहेत. माफिया राजकीय नेत्यांनी नदीकाठावरील शेती ठेक्याने घेत तर काहींनी स्वतःच्या शेतातून वाळूचे उत्खनन सुरु केले आहेत. त्यातच सहजपणे नदीपात्रातून देखील उपसा केला जातो. प्रति ट्रॅक्टर हजार ते बाराशे आणि ट्रक मागे दहा ते पंधरा हजाराने वाळूची विक्री केल्या जात आहे.

दिवसाकाठी पन्नास ते साठ वाळूचे ट्रक निमुळत्या रस्त्याने सुसाट वेगाने धावतात. खनिकर्म विभागाकडून रॉयल्टीच्या ट्रकला जीपीस लावल्या जाते. मात्र तेही क्रॅक केल्या जात आहे. पर्यावरण विभाग तर चिडीचूप बसलेला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com