
अंमलीपदार्थांची तस्करी व अनधिकृत वेंडर्सना अटकाव घालण्यासह गुन्ह्यांच्या तपासासाठी आरपीएफने विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून सातत्याने रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी केली जात आहे.
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने सोमावारी नागपूर रेल्वेस्थानकावर येऊन थांबलेल्या दानापूर एक्स्प्रेसमध्ये कारवाई करीत मद्यतस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. स्लिपर डब्यातून विदेशी मद्याच्या एकूण १३० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - मेडिकलच्या कृत्रिम अवयव केंद्रालाच आले अपंगत्व, साहित्य अन् मनुष्यबळाची कमतरता
अंमलीपदार्थांची तस्करी व अनधिकृत वेंडर्सना अटकाव घालण्यासह गुन्ह्यांच्या तपासासाठी आरपीएफने विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून सातत्याने रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी केली जात आहे. सोमवारी सकाळी पथकातील सदस्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी नागपूर रेल्वेस्थानकावर संयुक्तरित्या गस्त घालत होते. ११.४० वाजण्याच्या सुमारास हे पथक फलाट क्रमांक २ वर असताना दानापूर एक्स्प्रेस येऊन थांबली. जवानांनी वेगवेगळ्या डब्यांचा ताबा घेत तपासणी सुरू केली. एस-१० क्रमांकाच्या डब्यात तपासणी दरम्यान एक पोते बेवारस अवस्थेत पडून असल्याचे आढळले. प्रवाशांकडे विचारणा केली असता, कुणीही माहिती देऊ शकले नाही.
हेही वाचा - कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू
संशयामुळे पोते उघडून बघितले असता आत ११ हजार रुपये किमतीच्या दारूच्या १३० बाटल्या आढळून आल्या. हा मद्यसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. कारवाईत उपनिरीक्षक सचिन दलाल, उषा तिग्गा, भारत माने, श्याम झाडोकार, जितेंद्र कुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागचे उपनिरीक्षक विनोद भोयर, चंदु गोबाडे आदींचा समावेश होता. जप्त करण्यात आलेली दारू मध्य प्रदेशात निर्मित असून ती दारूबंदी असलेल्या वर्धा किंवा चंद्रपूर जिल्ह्यात नेली जात असावी, असे बोलले जात आहे.