स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: गिरीश व्यास यांना पर्याय कोण? बावनकुळेंचं नाव आघाडीवर

Local body elections who is option for Girish vyas in Nagpur
Local body elections who is option for Girish vyas in Nagpur

नागपूर ः जिल्हा परिषद, पदवीधर आणि पंचायत समिती निवडणुकांमधील पराभव, राज्यात असलेली महाविकास आघाडीची सत्ता आणि महानगरपालिकेतील नगरसेवकांमध्ये असलेला असंतोष पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतून अविरोध निवडून गेलेले आमदार गिरीश व्यास पुन्हा निवडणूक लढण्याची शक्यता कमीच आहे. व्यास यांना पर्याय म्हणून ग्रामीण भागात दबदबा असलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर आहे.

अलीकडे भाजपच्या झालेल्या बैठकीत व्यास यांनी निवडणुकीतील खर्च झेपणार नसल्याचे सांगून त्यांनी सक्षम पर्याय शोधण्यास पक्षाला मोकळीक दिली असल्याचे कळते. त्यामुळे आता सक्षम उमेदवार भाजपला शोधावा लागणार आहे. महापालिकेची चिंता नसली तरी यावेळी ग्रामीण भागात जनसंपर्क व सर्वपक्षीयांसोबत चांगले संबंध असलेला उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. हे गणित बघता माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशिवाय दुसरा पर्याय भाजपकडे दिसत नाही.

गिरीश व्यास अविरोध निवडून आले होते तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. जिंकण्याची शक्यता नसल्याने काँग्रेसने अशोक चव्हाण या नवख्या उमेदवारास उमेदवारी दिली. नंतर माघारही घ्यायला लावली होती. आता परिस्थिती उलट आहे. ग्रामीण भागात काँग्रेस आमदारांची संख्या वाढली आहे. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार चांगलेच पॉवरफुल झाले आहेत. याशिवाय महाआघाडी आहेत. 

एकत्रित ताकदीच्या भरवशावर महाआघाडीने पदवीधर निवडणुकीत माजी महापौर संदीप जोशी यांना पराभूत केले आहे. त्यामुळे आता कोणीही मला उमेदवारी द्या, असे म्हणण्याचे धाडसही करणार नाही. दुसरीकडे काँग्रेससुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक काँग्रेस सहजासहजी सोडणार नाही. या निवडणुकीत मतदार आपले असो का विरोधकांचे सर्वांनाच खूष करावे लागते. माजी आमदार सागर मेघे, राजेंद्र मुळक, अशोक मानकर यांना या निवडणुकीचा चांगलाच अनुभव आहे.

गिरीश व्यास यांनी जवळपास माघार घेतल्यातच जमा आहे. आता राज्यातील आणि जिल्ह्यातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला सर्वच आयुधे वापरावी लागणार आहेत. त्याशिवाय भारी खर्चाची तयारीसुद्धा ठेवावी लागणार आहे.

बावनकुळेंचे पुनर्वसन ?

बावनकुळे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारणे भाजपला चांगलेच महागात पडले. एक मोठा समाज भाजपपासून दुरावत चालला आहे. पदवीधर निवडणुकीत याची भाजपला प्रचिती आली आहे. समोर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे बावनकुळे यांचे पुनर्वसन करणे भाजपला आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com