शेतकरी चिंतातुर : तूरपिकावर अळीचा प्रकोप, कपाशीवर लाल्या तर संत्र्यावर डिंक

Loss of crops of farmers due to larvae
Loss of crops of farmers due to larvae

हिंगणा (जि. नागपूर) : खरीप हंगामात सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. कपाशीवरील लाल्याचा प्रकोप व गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. संत्रापिकावर डिंकाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुलतानी संकटांमुळेही शेतकरी चिंतातुर झाला आहे.

हिंगणा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६९,५२४.४७ हेक्टर आहे. सिंचनाखालील क्षेत्र ७९२३ असून बागायती क्षेत्र ५०३७ हेक्टर, खरीप पिकाखालील क्षेत्र ३६७६६ हेक्टर, रब्बी पिकाखालील क्षेत्र ८०९२ हेक्टर आहे. तालुक्यात साधारणतः खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भाजीपाला व फूलशेती केली जाते. ऑगस्टमध्ये सोयाबीन पीक शेतात डोलत असताना ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव झाला. पीक पिवळे पडले. २,४५० हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले.

सोयाबीन पीक हातून गेले तरी कापूस व तूर पिकामध्ये ही नुकसानभरपाई भरून निघेल, असा शेतकऱ्यांचा समज होता. कपाशीची लागवड येथील जवळपास २३ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. मात्र, कपाशीवरही काही प्रमाणात लाल्याचा प्रकोप झाला. गुलाबी बोंड अळीसुद्धा दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे पिकाची वाढ खुंटते. गुलाबी बोंड अळी पूर्णतः बोंड पोखरून काढते. यामुळे कापसाची प्रतवारी घसरते.

या वर्षीच्या हंगामात जवळपास ५,५०० हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीच्या शेंगांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. असेच वातावरण राहिल्यास तूरपीक हातातून जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. संत्रापिकावर डिंकाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे संत्र्याला छिद्र पडले, असून यातून रस वाहत आहे.

सोयाबीन पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. याचा अहवाल तहसील प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्‍यांकडे पाठवला आहे. मात्र, शेतकऱ्यांना किती मदत मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही. कापसाचे ५० टक्के, तुरीचे ७० टक्के नुकसान झाले आहे. कापूस व तुरीच्या नुकसानाचेही पंचनामे कृषी व महसूल विभागाने तातडीने करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा
तालुक्यातील टाकळघाट, अडेगाव, वानाडोंगरी, गुमगाव, कान्होलीबारा व हिंगणा महसूल मंडळात तूरपिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येईल. यानंतरच नेमका कोणत्या किडीचा प्रादुर्भाव तुरीवर झाला आहे, हे लक्षात येईल. शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग सूचना देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. 
- मिलिंद शेंडे 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com