Video : रोजीरोटीसाठी निघाले ते दोघे, नियतीच्या मनात होते काही वेगळेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

व्यवसायासाठीच परसोडी, खापरी येथून फकिरा मोहम्मद बाबूखान यांच्या बोलेरोत एकूण 13 विक्रेते बसून प्लॅस्टिकच्या वस्तू विक्रीसाठी निघाले. म्हाळगीनगर चौकातून जात असताना माटे वाईन शॉपकडून हुडकेश्वरकडे जाणाऱ्या एमएच 36 एए 1595 क्रमांकाच्या दहाचाकी टिप्परने बोलेरोला दाराच्या भागात जोरदार धडक दिली.

नागपूर : मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील अनेक गावांत घरोघरी प्लॅस्टिकच्या वस्तू तयार केल्या जातात. स्वस्त दरात तयार होणारे प्लॅस्टिकचे स्टूल, बादल्या, घमेले आदी साहित्य उत्पादक मंडळीच विक्रीसाठी देशाच्या विविध भागात जात असतात. त्यातील काहीजण नागपूर व आजूबाजूच्या गावातही येतात. त्यांचा रात्रीचा मुक्काम एका ठिकाणी असतो, दिवस उजाडताच ते वेगवेगळ्या भागात जाऊन साहित्याची विक्री करतात. असाच उद्देश घेऊन काही जण नागपूरला आले मात्र नियतीच्या मनात होते काही वेगळेच होते.

प्लॅस्टिकच्या वस्तू विकणाऱ्यांना घेऊन जात असलेल्या बोलेरोला भरधाव दहाचाकी टिप्परने धडक दिली. या भीषण अपघातात दोन विक्रेत्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर, दहा विक्रेते गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी 7 वाजता म्हाळगीनगर चौकात घडली. जखमींना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजन आहे. याप्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाला अटक केली आहे.

राहुल बंसी बंजारा (25) रा. ढाबा, ता. गरोट, जिल्हा मंदसोर आणि भैरूलाल कारूलाल गौड (25) रा. परपडा, ता. गरोट, जिल्हा मंदसोर (म.प्र.) अशी मृतांची नावे आहेत. जगदीश दुर्गा बंजारा (24) रा. खरडावडा, जि. गरोट, असे गंभीर जखमीचे नाव असून घटनेत बोलेरोचालक फकिरा मोहम्मद बाबूखान (45) रा. नारानिक, मंदसोर, गोपाल चेतनसिंग (25) रा. मंदसोर, बबलू बंजारा, विनोद मानगू बंजारा (25) रा. सीतामावू, मानडसोर, जगदीश बंसी चावडा (25), अनिल जगदीश गौड (22) बोरखडा, उज्जैन, तेजराम सब्बा बंजारा (65) रा. अमरापूर, मनसोर, जगदीश तेजराम बंजारा (21) रा. अमरापूर, मंदसोर आणि नरसिंह कनीराम मराशा (35) रा. मांगू का डेरा, पिपलाखेडा मंदसोर अशी जखमींची नावे आहेत. सर्वजण प्लॅस्टिचे विविध साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात.

हेही वाचा - गृहमंत्र्याचा मंत्र, आता विकासकामाला लागूया!

भरधाव टिप्परची बोलेरोला धडक
व्यवसायासाठीच परसोडी, खापरी येथून फकिरा मोहम्मद बाबूखान यांच्या बोलेरोत एकूण 13 विक्रेते बसून प्लॅस्टिकच्या वस्तू विक्रीसाठी निघाले. म्हाळगीनगर चौकातून जात असताना माटे वाईन शॉपकडून हुडकेश्वरकडे जाणाऱ्या एमएच 36 एए 1595 क्रमांकाच्या दहाचाकी टिप्परने बोलेरोला दाराच्या भागात जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल बंजारा आणि भैरूलाल गौड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जगदीश बंजारा हा गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच सक्करदरा पोलिसा घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी बोलेरो वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मेडिकलमध्ये भरती केले. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून टिप्परचालक शामनाथ सहदेव टिकापासे  (50) रा. हिवरीनगर याला अटक केली.

क्लिक करा - घरी सोडून देण्याचा बहाणा करून केला घात...

नागपूरच्या म्हाळगीनगर चौकातील थरारक घटना
मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील अनेक गावांत घरोघरी प्लॅस्टिकच्या वस्तू तयार केल्या जातात. स्वस्त दरात तयार होणारे प्लॅस्टिकचे स्टूल, बादल्या, घमेले आदी साहित्य उत्पादक मंडळीच विक्रीसाठी देशाच्या विविध भागात जात असतात. त्यातील काहीजण नागपूर व आजूबाजूच्या गावातही येतात. त्यांचा रात्रीचा मुक्काम एका ठिकाणी असतो, दिवस उजाडताच ते वेगवेगळ्या भागात जाऊन साहित्याची विक्री करतात. मृतक आणि जखमी विक्रेत्यांचा मुक्काम गेल्या काही दिवसांपासून खापरी येथे आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ही मंडळी साहित्यविक्रीसाठी कामठी, मोठा ताजबाग, सक्करदरा भागात जाण्यासाठी निघाली होती.  मात्र वाटेतच काळाने घाला घातला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major accident in nagpur captured in cctv