‘अमृत आहार’मधून कुपोषण मुक्ती; रामटेकमध्ये सकारात्मक परिणाम 

निलेश डोये 
Saturday, 31 October 2020

आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी २०१५ मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात १२६ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू आहे.

नागपूर : आदिवासी भागातील बालके सशक्त राहावीत, कुपोषणाची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्यावतीने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. जिल्ह्यात केवळ रामटेक तालुक्यात ही योजना राबविण्यात येत होती. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने हिंगणा व पारशिवनी तालुक्यातही योजना राबविण्याचा प्रस्ताव विभागाने शासनाला पाठविला आहे.

आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी २०१५ मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात १२६ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू आहे. गरोदर महिला, स्तनदा माता व सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची बालके या योजनेचे लाभार्थी आहेत. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

या लाभार्थ्यांना एका वेळेचे जेवण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते. प्रति लाभार्थी ३५ रुपये याप्रमाणे निधी शासन अंगणवाडीच्या आहार समितीला पुरविते. सध्या रामटेक तालुक्यात १,१२५ महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. तर ५,३६३ बालकांना अमृत आहार मिळत आहे.

योजनेच्या अनुषंगाने आदिवासी भागातील कुपोषणाच्या आकडेवारीत चांगला परिणाम दिसून आल्याने आता अमृत आहार हिंगणा तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील ४८ गावात तर पारशिवनी तालुक्यातील १४ गावात राबविण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे.

अधिक माहितीसाठी - नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल

कुपोषण आदिवासी भागात जास्त दिसून येते. याच्या निर्मुलना करता ही योजना सुरू करण्यात आली. रामटेक तालुक्यात याचा सकारात्मक परिणाम समोर आला. त्यामुळे आता हिंगणा आणि पारशिवनी तालुक्यात ती राबिण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात आला.
भागवत तांबे, 
महिला व बाल कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malnutrition is stopped due to Ameut aahar