तुम्हीच सांगा? याला आत्महत्या म्हणायची की अपघाती मृत्यू; त्याच्यासोबात असं का घडलं, वाचा सविस्तर...

अनिल कांबळे
गुरुवार, 16 जुलै 2020

संतोष विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. दोन्ही मुले पत्नीसह छिंदवाडा शहरात राहतात. अधूनमधून संतोष पत्नी व मुलांच्या भेटीला जात होता. लॉकडाउन असल्याने ते दोन महिने सासुरवाडीत राहून आले. मानकापुरात संतोष आणि अविवाहित बहीण सरोज हे दोघेही भाड्याने राहतात.

नागपूर : दारूच्या व्यसनामुळे हातची नोकरी गेली. नोकरी गेल्याने पैसाही जवळ नव्हता. व्यसनाची तलब स्वस्थही बसू देत नव्हती. जवळचे होते नव्हते संपले. पत्नी आणि मुले दुसऱ्या गावी राहत असल्याने त्यांना भेटता येत नव्हते. लॉकडाउनमुळे दुरावा निर्माण झाला होता. प्रचंड निराशा आणि तणावात त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यासाठी खोलीतील सिलिंग फॅनला दोरीही बांधली... परंतु, वजनामुळे दोरी तुटली तरीही त्याचा जीव गेला. यामुळे प्रश्‍न उपस्थित होतो तो म्हणजे "याला आत्महत्या म्हणायची की अपघाती मृत्यू', वाचा सविस्तर... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हरिचरण चव्हाण (वय 40, रा. नशेमन सोसायटी, गणपतीनगर) हे मुळचे छिंदवाडा येथील रहिवासी आहे. ते गेल्या सहा महिन्यांपूर्वी तिरपुडे महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून कामावर लागले होते. मात्र, संतोष यांना दारूचे व्यसन असल्याने अधूनमधून सुट्या व्हायच्या. त्यातच काही वेळा कर्तव्यावर व्यसनाधीन होऊन आल्याचा प्रकारही घडला. सततच्या तक्रारींमुळे महाविद्यालय प्रशासनाने त्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. बेरोजगार झाल्यामुळे ते आणखी दारू प्यायला लागले.

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...

संतोष विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. दोन्ही मुले पत्नीसह छिंदवाडा शहरात राहतात. अधूनमधून संतोष पत्नी व मुलांच्या भेटीला जात होता. लॉकडाउन असल्याने ते दोन महिने सासुरवाडीत राहून आले. मानकापुरात संतोष आणि अविवाहित बहीण सरोज हे दोघेही भाड्याने राहतात. दारूचे व्यसन आणि खिशात पैसे नसल्याने ते काही दिवसांपासून नैराश्‍यात गेले होते. सतत तणावात राहत होते. 

सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांनी वरच्या माळ्यावर सिलिंग फॅनला गळफास लावण्यासाठी दोरी बांधली. त्याचा फास तयार केला. बेडवर खुर्ची ठेवली आणि गळफास लावला. मात्र, संतोषच्या वजनाने दोरी तुटली. त्यामुळे ते उंचावरून आदळले. डोक्‍याच्या भारावर पडल्याने ते गंभीर जखमी झाला. त्यांच्या डोक्‍यातून रक्‍त वाहायला लागले. उंचावरून पडल्याने डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मानकापुरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अधिक माहितीसाठी - लग्नापूर्वी मटण पार्टी देणे नवरदेवाला पडले महागात; या जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, गुन्हा दाखल

बहीण उठवायला गेली असता उघडकीस आला प्रकार

सकाळी बहीण सरोज संतोष यांना झोपेतून उठवायला गेली असता भाऊ रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिने लगेश शेजारी आणि पोलिसांना फोन केला. मानकापूरचे पीएसआय कैलास मगर यांनी घटनास्थळाचा पंचानामा केला. त्यांना संशय आल्यामुळे वरिष्ठांना बोलावून वैद्यकीय चाचणीसाठी मृतदेह रवाना केला. मात्र, डॉक्‍टरांच्या अहवालानुसार उंचावरून खाली पडल्यामुळे मेंदूला जबर मार लागून संतोषचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man commits suicide by hanging in Nagpur