VIDEO: महापौरांच्या आदेशाचं वृत्त वाचून झाला मृत्यू अन् मृतदेह घेऊन नातेवाईक पोहोचले महापालिकेत  

राजेश प्रायकर 
Tuesday, 9 February 2021

राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरणला (साई) १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लीजवर दिली आहे. या प्रकल्पाचा आढावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी काल, सोमवारी त्यांच्या कक्षात घेतला.

नागपूर ः ‘साई`च्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करा, २४ तासांचा नोटीस देऊन कारवाई करावी, असे निर्देश काल, सोमवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले होते. या निर्देशाचे वृत्त आज सर्वच वर्तमानपत्रात झळकले. हे वृत्त वाचून गिरीश वर्मा यांना हृदयविकाराचा धक्का बसला व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करीत कुटुंबीय पार्थिवासह महापालिकेत पोहोचले. त्यामुळे खळबळ उडाली अन् महापालिका प्रशासनाने पोलिसांना आमंत्रित केले. रात्री आठ वाजता सदर पोलिसांनी नागरिकांना ताब्यात घेतले असून पार्थिव मेडिकलमध्ये पाठविण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरणला (साई) १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लीजवर दिली आहे. या प्रकल्पाचा आढावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी काल, सोमवारी त्यांच्या कक्षात घेतला. या बैठकीत आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सागर मेघे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह महापालिका अधिकारी, साईचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अतिक्रमणधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देश महापौरांनी दिले. या बैठकीचे वृत्त आज सर्वच वर्तमानपत्रात छापून आले. या वृत्ताने प्रस्तावित जागेवरील तरोडी खुर्द व वाठोडावासींची झोप उडाली. 

हेही वाचा - "मोदींच्या कानमंत्रावर चालताहेत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल"

याच दरम्यान सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तरोडी येथील सागर ले-आऊटमधील निवासी ५० वर्षीय गिरीश वर्मा घराच्या बांधकामावर पाणी मारत होते. हे वृत्त वाचताच डोक्यावरील छप्पर जाणार या चिंतेने त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी सांगितले. यातच त्यांचा मृत्यू झाला. 

या मृत्यूसाठी महापालिका जबाबदार असून मृतकांच्या कुटुंबीयांना तसेच येथील रहिवाशांना न्याय देण्याच्या मागणीसाठी पार्थिवासह महापालिकेत आल्याचे जमलेल्या नागरिकांनी नमुद केले. अचानक पार्थिव घेऊन महापालिकेत पोहोचल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ पोलिसांना आमंत्रित केले. संतप्त नागरिकांची महापौर व आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी सुरू असतानाच पोलिस पोहोचले. यावेळी जि. प. सदस्य नाना कंभाले, अश्वजित वर्मा व तरोडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी चार वाजतापासून आलेल्या नागरिकांना सदर पोलिसांनी रात्री आठ वाजता ताब्यात घेतले. आयुक्त आल्याशिवाय पोलिस स्टेशनमधूनही जाणार नाही, अशी भूमिका जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी घेतली.

महापौर आल्याशिवाय हटणार नाही

पोलिसांनी यावेळी कुटुंबीयांसमवेत आलेल्या जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांच्यासोबत चर्चा केली. परंतु महापौर, आयुक्त आल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी कणखर भूमिका त्यांनी घेतली. परंतु महापौर आले नाही. अतिरिक्त आयुक्त चर्चेसाठी आले. नागरिकांनी आयुक्तांचा हट्ट धरत न हटण्याचा निर्णय घेतला.

महापौरांनी काढला पळ

महापौर दयाशंकर तिवारी चार वाजताच्या सुमारास त्यांच्या कक्षात बसले होते. अचानक पार्थिवासह आलेल्या संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर महापौरांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी घोषणा आणखी तीव्र केल्या.

 

 

कुटुंबीयांचा आधारच गेला

मृतक गिरीश वर्मा यांची दोन्ही मुले प्रतिक व अल्केश महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्यांच्या पत्नी पुष्पा या गृहिणी आहेत. फळ विक्री करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे वर्मा कुटुंबीयांचा आधारच गेला. त्यांच्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जमिनी रहिवाशांच्या मालकीच्याच

मृतक गिरीश वर्मा यांचे १५०० वर्गफूटाचा भूखंड आहे. यासह पाचशे, हजार वर्गफूटाचे अनेक भूखंड असून नागरिकांनी ले-आऊटच्या मालकाकडून रितसह खरेदी केले असून रजिस्ट्रीही झाली आहे. या जमिनी येथील रहिवाशांच्या मालकीच्याच असल्याचा दावाही नागरिकांनी रजिस्ट्री दाखवत केला.

हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन विक’ने घातला घोळ अन् दोन कुटुंबांमध्ये...

तीन वर्षांपूर्वीही पाठविले होते नोटीस

यापूर्वी साईच्या प्रस्तावित जागेसाठी येथील दोनशेवर रहिवाशांना नोटीस बजावले होते. त्यावेळी येथील नागरिकांनी महापालिका व एनएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला होता. महापालिकेचा कुठलाही संबंध नसताना नोटीस बजावण्याची कारवाई केली जात असल्याचे अश्वजित वर्मा म्हणाले.

पटोलेंच्या निर्देशालाही हरताळ

याप्रकरणी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत १६ डिसेंबरला बैठक घेतली होती. या बैठकीत तरोडी व वाठोड्यातील नागरिकांसह पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मनपा आयुक्त, एनएमआरडीए आयुक्तही उपस्थित होते. या बैठकीत पटोले यांनी अधिकाऱ्यांना तोडगा निघाल्याशिवाय रहिवाशांना हात लावू नये, असे निर्देश दिले होते, अशी माहिती जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man died by reading news in newspaper in Nagpur people protested