'मौत का तालाब' म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल्पी तलावात बुडून युवकाचा मृत्यू; अंघोळीचा मोह जिवावर बेतला

अजय धर्मपुरीवार
Friday, 9 October 2020

७ ऑॅक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास इलेक्ट्रीक झोन परिसरातील सहा मित्र तीन दुचाकीवर फिरायला गेले. तेथे अंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. 

हिंगणा (जि. नागपूर) : ‘लव्हर्स पॉइंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहगाव (झिल्पी) धरणावर फिरायला गेलेल्या सहा मित्रांपैकी एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. 

७ ऑॅक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास इलेक्ट्रीक झोन परिसरातील सहा मित्र तीन दुचाकीवर फिरायला गेले. तेथे अंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. सहा युवकांना पोहता येत नव्हते, तरीसुद्धा त्यांनी तलावात अंघोळ करण्याचा आग्रह धरला. आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही आणि काळाने घात केला. 

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

इंदर मोहन जगदीप कश्यप (वय३१, इलेक्ट्रिक झोन, कार्तिक नगर) येथील रहिवासी आहे. इंदर हा अंघोळ करता करता अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे तलावातील गाळात बुडाला. इतर मित्रांनी दुपट्टे टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाच पोहता येत नसल्यामुळे इंदरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास मिळाली. 

मृतदेह मिळालाच नाही 

माहिती मिळताच ठाणेदार सारीन दुर्गे यांच्यासह पथक पोहोचले. मृत युवकाचा शोध घेण्यात आला. मात्र मृतदेह खोल पाण्यात असल्यामुळे त्यांना अग्निशामक विभागाला पाचारण करून मृतदेहाचा शोध घेण्यात आला. परंतू पाच वाजताच्या सुमारास मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या व शेवटी अंधार झाल्यामुळे अग्निशमन विभागाला तसेच परत जावे लागले. 

सविस्तर वाचा - तो ड्युटीसाठी दररोज चालतो २२ किमी पायी!

सकाळी पाण्याबाहेर आला मृतदेह 

गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर आला‌. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला‌. पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सांरिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमृता सोमवंशी व पोलिस कर्मचारी विशाल तोडासे, आशीष पौनीकर करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man is no more due to drowning in Zilpi lake in nagpur