बापरे! शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावावर तब्बल ७० कोटींचा गंडा; मेट्रोव्हीजनच्या गुरनुलेला अटक

Metrovision's Vijay Gurnule arrested
Metrovision's Vijay Gurnule arrested

नागपूर : शेअर बाजारात गुंतवणुकीचा फंडा देऊन आर्थिक फायदा होण्याच्या नावावर १५ हजार गुंतवणुकदारांना ७० कोटींनी गंडा घालणाऱ्या मेट्रोव्हीजन कंपनीचा संचालक विजय रामदास गुरूनुले (३९) याला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी गुरनुलेला शेगांवमधून अटक केली. या प्रकरणात गुरनुले याच्यासह १० आरोपींना अटक केली.

आरोपींमध्ये ज्ञानेश्‍वर बावणे, जीवनदास आनंदराव दंडारे ((आनंदनगर, ५२), रमेश सूरजलाल बिसेन (३८, निलडोह), अतुल युवराज मेश्राम (२९, अमरनगर), अविनाश महादेव महाडोळे (३८, महाजनवाडी),राजू नागोराव माहुर्ले (४८,सोमलवाडा चौक), श्रीकांत केशव निकुरे ( वानाडोंगरी), देवेंद्र भीमराव गजभीये (३४, ब्रम्हपुरी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी गणेश चाफले (३९, सुजाता लेआउट, साईनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, दिलीप झळके यांच्या उपस्थितीत पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र गजभिये व विजय गुरनुले या दोघांनी २०१५ मध्ये मेट्रोव्हिजन बिल्डकॉन नावाची कंपनी स्थापन केली. कंपनीतील योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखविले. गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी दोघांनी कारंजा घाडगेत दहा एकर शेतीवर पाडलेल्या प्लॉटची नोटरी गुंतवणूकदारांच्या नावे करून दिली. सुरुवातीला गुरनुले व गजभिये या दोघांनी नियमितपणे गुंतवणूकदरांना मोबदला व व्याज दिले. गुंतवणूकदारांचा दोघांवरील विश्वास वाढला.

गुंतवणूकदारांनी नातेवाइकांनाही या कंपनीत गुंतवणूक करायला लावली. यानंतर गुरनुले याने नवीन योजना सादर केली. हिरे, सोने व औषध कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. याशिवाय बीट क्वॉइनमध्येही गुंतवणुकीचे आमिष दाखविले.

अशाप्रकारे १५ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी गुरनुलेच्या कंपनीत ७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसांपूर्वी गुरनुले याने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. गुंतवणूकदार गणेश चाफले (वय ३९,रा.साईनगर) यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे तक्रार केली.

रेड्डी यांनी पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांना प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले. हसन यांच्या नेतृत्वात प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलिस उपनिरीक्षक विशाल नांदगाये, मनोज निमजे, स्वप्निल करंड, अतुल तलमले, मिलिंद मेश्राम व अश्विन चौधरी यांनी प्रकरणाचा तपास करून ठगबाजांना अटक केली.

सापळा रचून अटक

गुन्हा दाखल झाल्याचे कळताच गुरनुले नागपुरातून पसार झाला. पोलिसांनी मोबाइल लोकेशनद्वारे गुरनुलेचा शोध सुरू केला. गुरनुले आधी अमरावती, नंतर वाशिम, बुलडाणा येथे गेला. गुरनुले बुलडाण्यात असल्याचे कळताच प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. मात्र तोपर्यंत गुरनुले हा कारने शेगाव येथे आला. पोलिस त्याच्या मागावरच होते. शेगावमध्ये तब्बल २५ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी गुरनुले याला अटक केली.

देशभरात घालायचा होता गंडा

गुरुनुले व गजभियेंचे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान पश्चिम बंगाल, केरळ, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्येही जाळे आहेत. येथील गुंतवणूकदारांनाही गंडा घालण्यात आला आहे. या फसवणुकीचा आकडा १०० कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन डीसीपी नुरूल हसन यांनी केले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com