वाद मिटविण्यात मध्यस्थाची भूमिका नेहमीच महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मध्यस्थी ही वाद निवारणाची परिणामकारक पद्धत आहे. पंचायतीच्या स्वरूपात ती पूर्वीपासून अस्तित्वात होती. महायुद्धोत्तर काळात जागतिक स्तरावर तिची आवश्‍यकता ठळक मानली गेली. न्यायाधीशांवर न्यायपूर्ण व तटस्थ निर्णयप्रक्रियेची जबाबदारी असते. प्रत्येक प्रकरणात समान वितरणाच्या शक्‍यता असतात. मध्यस्थाची भूमिका बजावताना दोन्ही बाजूंचे मत व स्थितीचे अवलोकन करून अशा शक्‍यतांचा शोध घेतला पाहिजे.

अमरावती : वाद निवारणासाठी मध्यस्थीची प्रकरणे हाताळताना समान वितरणाच्या सर्व शक्‍यतांचा शोध घेणे आवश्‍यक असते. सूक्ष्म अवलोकनातून समन्वयाच्या व समान वितरणाच्या शक्‍यता सापडतात. मध्यस्थीतून वाद निवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतून विचारमंथन व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी केले.

महाराष्ट्र सेवाविधी प्राधिकरण, मुंबई येथील मुख्य मध्यस्थ केंद्र व जिल्हा सेवाविधी प्राधिकरण यांच्या समन्वयाने हॉटेल ग्रॅंड महफिल येथे क्षमता निर्मिती व मध्यस्थीच्या क्रियाकलांपाचे मूल्यांकन, या विषयावर आयोजित प्रादेशिक मध्यस्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थ संनियंत्रण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी, नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती व अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे, नागपूर खंडपीठाच्या मुख्य मध्यस्थ संनियंत्रण उपसमितीचे सदस्य न्यायमूर्ती झेड. ए. हक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सविस्तर वाचा - तरुणाईच्या मुखी एकच आवाज, काय पो चे

 

मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग म्हणाले, की मध्यस्थी ही वाद निवारणाची परिणामकारक पद्धत आहे. पंचायतीच्या स्वरूपात ती पूर्वीपासून अस्तित्वात होती. महायुद्धोत्तर काळात जागतिक स्तरावर तिची आवश्‍यकता ठळक मानली गेली. न्यायाधीशांवर न्यायपूर्ण व तटस्थ निर्णयप्रक्रियेची जबाबदारी असते. प्रत्येक प्रकरणात समान वितरणाच्या शक्‍यता असतात. मध्यस्थाची भूमिका बजावताना दोन्ही बाजूंचे मत व स्थितीचे अवलोकन करून अशा शक्‍यतांचा शोध घेतला पाहिजे. या शक्‍यता तपासून वितरणाचा सुवर्णमध्य गाठता येतो. त्यासाठी या परिषदेतून मंथन व्हावे. न्यायवितरणासह वाद निवारण हेही न्यायालयाचे कर्तव्य असते. मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभकारक असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन न्यायमूर्ती श्री. धर्माधिकारी यांनी या वेळी केले.
मध्यस्थीचे फायदे, मध्यस्थ व्यक्तीचे अनुभव, मध्यस्थी प्रक्रिया राबविताना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना या विषयांवर चार सत्रांमध्ये परिषद झाली. या सत्रांतून न्यायमूर्तींनी मध्यस्थीसंदर्भात विविध विषयांवर उपस्थित न्यायाधीश व अधिवक्ता यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला एस. जोशी-फलके यांनी आभार मानले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. संतानी यांनी संयोजन केले. परिषदेत विदर्भातील 11 जिल्ह्यांतील सुमारे 500 न्यायाधीश, 50 प्रशिक्षित मध्यस्थ, अधिवक्ता व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Middle person's role is very important in quarrel