अबब ! बिडीओंच्या निरोप सोहळ्याला मंत्री, आमदारासह अन्य लोकप्रतिनिधी, काय झाले असे....

भिवापूर : बीडीओच्या सत्कारानिमित्त उपस्थित झालेली राजकीय मंडळी.
भिवापूर : बीडीओच्या सत्कारानिमित्त उपस्थित झालेली राजकीय मंडळी.

भिवापूर (जि.नागपूर) : बिडीओंच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला कॅबिनेट मंत्री, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार समित्यांचे सभापती आदींसह अन्य विभागाच्या अनेक अधिका-यांची उपस्थिती आणि त्यांच्याच साक्षीने संपूर्ण सोहळ्यात सोशल डिस्टंसनिंगच्या नियमांची खुलेआम केलेली अवहेलना येथे चर्चेचा विषय ठरली.

सुचनांचे "डोज' फक्‍त जनतेसाठी !
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकीकडे शासन विविध नियमांचे पालन करण्याचे जनतेला दररोज आवाहन करते आहे. सामाजिक अंतर ठेवून वागा, मास्क वापरा, काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सुचनांचे "डोज' सरकार मागील तीन महिन्यांपासून सकाळ-संध्यकाळ जनतेला पाजत आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी उघडपणे या सुचनांची पायमल्ली करताना दिसत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाचे नियम केवळ सर्वसामान्यांकरिताच आहेत का, त्यातून लोकप्रतिनिधींना विशेष सुट तर देण्यात आली नाही ना, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

अधिक वाचा : (video)गुमगाववासीयांना आजही पावसाळयात सहन कराव्या लागतात या वेदना...

 भिवापूरकर आश्‍चर्यचकित झाले
येथील पंचायत समितीचे बहुचर्चित बिडीओ दिलीप भगत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा सोमवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.(एक दिवसापूर्वीच हा सोहळा आयोजित करण्यामागचे कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.)सोहळ्याच्या तयारीसाठी नेहमीप्रमाणे पं.स.च्या कर्मचा-यांनी सकाळपासूनच घाम गाळला. व्हिआयपी' उपस्थित राहणार असल्याने त्यांचा घाम निघणे क्रमप्राप्त होते. दुपारी तीननंतर पाहुण्यांच्या आगमनाची वेळ ठरली होती. परंतु नेहमीसारखेच उशीराने म्हणजे साडेपाचच्या सुमारास एकदाचे पाहुण्यांचे आगमन झाले. पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्‍मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती तापेश्वर वैद्य, सभापती नेमावली माटे, सभापती उज्वला बोढारे, सभापती भारती पाटिल आदींचा पाहुण्यांत समावेष होता. त्यांचा लवाजमा भिवापुरच्या सिमेत पोहचला, आणि हा ताफा बघणारे भिवापूरकर आश्‍चर्यचकित झाले.

टाळेबंदीच्या काळात उपद्‌व्याप
टाळेबंदीच्या काळात जेथे सामान्य जनतेला घराबाहेर पडण्यावर शासनाने निर्बंध लादले आहेत, तेथे हा शासकीय वाहनांतील नेत्यांचा लवाजमा एकत्र बघून अनेकांचे डोळे विस्फारले गेले. एखादे मोठे कारण असावे, असा त्यांचा प्रारंभी समज झाला. परंतु जेव्हा त्यांच्या आगमनाचे कारण कळले, तेव्हा अनेकांनी तोंडावर हात ठेवत आश्‍चर्य व्यक्त केले. " बिडीओला निरोप द्यायला इतकी मंडळी ! ' असे उदगार अनेकांच्या मुखातुन सहजच बाहेर पडले. यापूर्वी इतके पदाधिकारी कधीच एकत्र न बघितलेल्या भिवापूरकरांना, बिडिओ दिलीप भगत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सोहळ्याला वरील पदाधिका-यांना एकत्र आलेले बघून फार नवल वाटले.

"सोशल डिस्टंसनिंग' पाळले नाही
या बहुचर्चित सोहळ्याला नेतेमंडळीसोबत ऊमरेड क्षेत्राचे आमदार राजू पारवे, पं.स.च्या सभापती ममता शेंडे, उपसभापती कृष्णा घोडेस्वार यांच्या सोबतच पं.स.सदस्य व तालुक्‍यातील इतर काही नेते व शासकीय अधिका-यांनी हजेरी लावली होती. सोहळ्याच्या समाप्तीनंतर झुनका भाकर व सोबतीला लाडवाच्या पाहुणचाराची व्यवस्था करण्यात आली होती. हा सर्व कार्यक्रम ज्या सभागृहात पार पडला. तिथे कुठेच "सोशल डिस्टंसनिंग' पाळलेले बघायला मिळाले नाही. शिवाय जे उपस्थित होते, त्यात मोजक्‍याच मंडळींनी तोंडावर मास्क बांधले होते. कोरोनाचा धोका टळलेला नाही, विशेष करुन ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या सुचनांना "वाटाण्याच्या अक्षता' लावत व सामाजिक सुरक्षेचे भान विसरुन बिडीओसारख्या अधिका-याच्या सत्कार सोहळ्याला जबाबदार लोकप्रतिनिधींनी गर्दी करणे कितपत योग्य आहे , असा प्रश्न येथील अनेक सुज्ञ नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com