हिरव्या किड्यानंतर वाढला डासांचा त्रास, घराघरात तापाचे रुग्ण

योगेश बरवड
Sunday, 15 November 2020

यंदा परतीचा पाऊस चांगलाच बरसला. यामुळे रिकाम्या भूखंडांवर गवत आणि झुडपांची वाढ झाली आहे. खोलगट भागांतील जमिनीत अजूनही ओलावा आहे. उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने डासांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे.

नागपूर : शहरातील हिरव्या किड्यांचा जोर ओसरताच डासांचा हैदोस सुरू झाला आहे. डासांच्या उच्छादामुळे रात्रीची झोपच उडाली आहे. शहराच्या सीमेलगत असणाऱ्या वाठोडा भागात डासांचा प्रादुर्भाव फारच अधिक असून तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात फवारणीच्या (फॉगिंग) मागणीने जोर धरला आहे.

हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

यंदा परतीचा पाऊस चांगलाच बरसला. यामुळे रिकाम्या भूखंडांवर गवत आणि झुडपांची वाढ झाली आहे. खोलगट भागांतील जमिनीत अजूनही ओलावा आहे. उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने डासांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. वाढत्या थंडीसोबत डासांची संख्याही चांगलीच वाढली आहे. दिवसाही घरात डासांचा वावर असतो. सायंकाळनंतर त्रास अधिकच वाढतो. यामुळे सायंकाळनंतर घराचे दार उघडे ठेवण्याचीही सोय उरली नाही. सायंकाळनंतर घरांची दारे बंद असलेली दिसतात. वाठोडा परिसरातील गिड्डोबानगर भागातील नागरिकांनी तर त्रागा व्यक्त केला. विद्यानगरातही डासांचा असाच त्रास आहे. खरबी किंवा दिघोरीच्या दिशेने जसजसे पुढे जाल तसतसा डासांची समस्या अधिकाधिक गंभीर होत गेलेली दिसेल. 

हेही वाचा - Motivation Story : सुहासने लावला ‘सेफ फूड वॉश’ लिक्विडचा शोध; भाज्या होणार...

डासांमुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. घरातील डास घालवण्यासाठी असणाऱ्या सर्व युक्ती वापरुनही काहीच उपयोग होत नाही. ही समस्या केवळ वाठोडा किंवा लगतच्या परिसरापुरती मर्यादित नाही तर शहराच्या सभोवताल सीमावर्ती भागात अशीच परिस्थिती असल्याचे नागरिक सांगतात. महापालिकेने नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घ्यावी, रिकाम्या भूखंडांवरील गवत व झुडपे काढावी, सोबतच फॉगिंगवर भर देऊन डासांच्या समस्येतून मुक्ती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mosquitoes increases in wathoa of nagpur