कामानिमित्त निघालेल्या मुलीच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू; कार-ऑटोची धडक

योगेश बरवड
Saturday, 7 November 2020

गंभीर दुखापत झाल्याने अंजना यांचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. याप्रकरणी तुळजाई यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी ऑटोचालक ताजुबसह कारचालक आशीष बालपांडे (३३, रा. साईकृपा सोसायटी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर : कार व ऑटोची समोरासमोर धडक होऊन मुलीच्या डोळ्यादेखत वृद्ध आई ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी प्रतापनगर हद्दीतील पांडे ले-आउट परिसरात घडली. अंजना सदावर्ते (७०) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजना सदावर्ते या गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जयवंतनगर, रामेश्वरी रिंगरोड येथे राहणारी मुलगी तुळजाई कुलकर्णी (४७) यांच्यासोबत ऑटोतून कामानिमित्त जात होत्या. मोहम्मद ताजुब मोहम्मद अल्ताफ याच्या ऑटोतून त्यांचा प्रवास सुरू होता. पांडे ले-आउटच्या लक्ष्मी किराणा दुकानासमोरून जात असताना एमएच ४९ एएस ९९५८ क्रमांकाच्या कारचा आणि ऑटोची समोरासोर धडक झाली.

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

यात गंभीर दुखापत झाल्याने अंजना यांचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. याप्रकरणी तुळजाई यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी ऑटोचालक ताजुबसह कारचालक आशीष बालपांडे (३३, रा. साईकृपा सोसायटी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेचा छळ, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे प्रकरण अजनी हद्दीत उघडकीस आले आहे. सासरच्यांनी स्त्रीधनावरही डल्ला मारला. याप्रकरणी पती, सासरा, दीर, जाऊसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती नितीन शर्मा (४४), दीर मुकेश शर्मा (४२), जाऊ कविता शर्मा (४०), दीर साईराम (३०), जाऊ प्रियंका, सासरे शितलाप्रसाद शर्मा व प्रतिक अशी आरोपींची नावे आहेत. किर्ती शर्मा (३८) असे पीडितेचे नाव आहे.

जाणून घ्या - नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव

हावरापेठेतील रहिवासी असणारे शर्मा कुटुंब व्यावसायिक आहे. नितीन आणि किर्ती यांचे २०१४ मध्ये रीतीरिवाजानुसार लग्न झाले. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर किर्तीचा छळ सुरू झाला. आई-वडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. प्रारंभी किर्ती यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण, त्रास वाढतच गेला. आरोपींनी किर्ती यांना लग्नात मिळालेले स्त्रिधनही स्वतःकडे ठेवून घेतले. त्रास असाह्य झाल्याने किर्ती यांनी अजनी ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mothers death in the eyes of the girl