युवकाला ‘पोलिसांचा पंटर’ असे म्हणून डिवचणे भोवले; दगडाने ठेचून खून

अनिल कांबळे
Thursday, 12 November 2020

बुधवारी रात्री नऊ वाजता जितेंद्र हा जरीपटक्यातील आंबेडकर रुग्णालयाजवळ उभा होता. तेथे बंटी आला. त्याने जितेंद्रला दारू पाजण्यासाठी म्हटले. जितेंद्रने लगेच दारूची बाटली आणली आणि रुग्णालयाच्या मागच्या बाजूला दोघांनीही अकरा वाजेपर्यंत दारू ढोसली.

नागपूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला उपराजनीत हत्याकांडाचा थरार रंगला. ‘पोलिसांचा पंटर’ असल्याचे डिवचण्यावरून युवकाने एका कुख्यात तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी आरोपी युवकाला अटक केली. सागर उर्फ बंटी उर्फ गुलाम भाई वासूदेव जाधव (४०) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. जितेंद्र अनिल पाटील (२५) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी जाधव हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल आहे. बंटीची जरीपटक्यात चांगली दहशत होती. तो वस्तीत वसुली, खंडणीसाठी टोळी बनवून राहत होता. तो गेल्या काही दिवसांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहातून सुटून बाहेर आला होता. त्याची आरोपी जितेंद्र पाटीलशी ओळख होती.

सविस्तर वाचा - युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा

जरीपटका पोलिसांनी बंटीवर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जितेंद्र हा पोलिसांना माहिती देतो आणि तो पोलिसांचा पंटर असल्याचा संशय होता. त्यामुळे तो नेहमी पोलिसांचा पंटर असे म्हणून डिवचत होता.

बुधवारी रात्री नऊ वाजता जितेंद्र हा जरीपटक्यातील आंबेडकर रुग्णालयाजवळ उभा होता. तेथे बंटी आला. त्याने जितेंद्रला दारू पाजण्यासाठी म्हटले. जितेंद्रने लगेच दारूची बाटली आणली आणि रुग्णालयाच्या मागच्या बाजूला दोघांनीही अकरा वाजेपर्यंत दारू ढोसली. दारूच्या नशेत बंटीने जितेंद्रला पोलिसांचा पंटर म्हटले. त्यामुळे जितेंद्रला ती बाब खटकली.

अधिक माहितीसाठी - ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 

त्याने बाजूला पडलेला मोठा दगड घेतला आणि बंटीच्या डोक्यात घातला. बंटी रक्ताच्या थारोळ्यात पडला. जितेंद्रने पळ काढला. रात्रभर अतीरक्तस्त्राव झाल्यामुळे बंटीचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला दोन तासांत अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of Tadipar goon on the eve of Diwali