दुचाकीने जाताना भावाला व्हॉट्सॲपवर पाठवले लोकेशन; जाऊन बघितले असता विहिरीत आढळला मृतदेह

अनिल कांबळे-अजय धर्मपुरीवार
Thursday, 8 October 2020

शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला. याची माहिती मृताच्या चुलत भावाने पोलिसांना दिली. सहा ऑक्टोबरला रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद रघुवंशी व पोलिस उपनिरीक्षक विनोद नरवाडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

हिंगणा (जि. नागपूर) : चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून संतापलेल्या युवकाने गावातील तरुणाची हत्या करून मृतदेह दुचाकीसह विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना सुकळीगुपचुप येथे उघडकीस आली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव बंटी शामराव सिडाम (वय २४, रा. सुकळी गुपचूप) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी सिडामच्या चुलत बहिणीशी गावातीलच धीरज झलके (३२) याचे प्रेमसबंध होते. याची कुणकुण लागताच बंटीने धीरजला याबाबत खडसावले. सहा आक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बंटी दुचाकीने जात असताना धीरजही त्याच्यासोबत गेला. धीरजने त्याला जबर मारहाण केली. त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला. गावातीलच शंभरकर यांच्या शेतशिवारातील विहिरीजवळ त्याचा मृतदेह ओढत नेला. पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकीला बंटीचा मृतदेह बांधला. त्यानंतर दुचाकीसह मृतदेह विहिरीत फेकून दिला.

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा

कुटुंबीयांनी बंटी हरवल्याची तक्रार सहा ऑक्टोबरला सायंकाळी पोलिसात दाखल केली. सात ऑक्टोबरला सकाळीच शंभरकर यांच्या शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला. याची माहिती मृताच्या चुलत भावाने पोलिसांना दिली. सहा ऑक्टोबरला रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद रघुवंशी व पोलिस उपनिरीक्षक विनोद नरवाडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

या प्रकरणातील आरोपी धीरज झलके व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त विवेक मसाळ, सहायक पोलिस उपायुक्त सिद्धार्थ शिंदे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपायुक्त नंदनवार यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक रघुवंशी करीत आहेत.

अधिक माहितीसाठी - दिवसा चटके, पहाटे थंडी; सोबतीला उद्यापासून वादळी पाऊसही

भावाला पाठवले व्हॉट्सॲप लोकेशन

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता बंटी दुचाकीने घराबाहेर पडला. सहा वाजताच्या सुमारास बंटीने आपला लहान भाऊ लोकेशच्या मोबाईलवर लाईव्ह लोकेशन पाठवले. अचानक आलेल्या लोकेशनमुळे भाऊ चिंतेत पडला. त्याने बंटीला फोन लावला, मात्र फोन स्विच ऑफ दाखवत होता. त्यानंतर बंटी बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या व्हॉट्सॲप लोकेशनवरून गुमगावपासून ते महालक्ष्मी लॉनपर्यंत बंटीचा शोध घेतला. शेवटी बंटीचा मृतदेहच विहिरीत आढळला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young man in a love affair in rural Nagpur