'ते' होते म्हणून विमान हॉंगकॉंगला उतरवले नाही, वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

दक्षिण कोरियात सेवरन्स हॉस्पिटलद्वारे आंतरराष्ट्रीय रोबोटिक्‍स सर्जन्सची परिषद झाली. यात नागपूरचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांची राज्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली होती. रोबोटिक्‍स शस्त्रक्रिया या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. दी विंची एसपी या जागतिक दर्जाच्या रोबोटवर प्रशिक्षणही त्यांनी घेतले. दक्षिण कोरियातील सेऊल येथून परिषद आटोपून डॉ. देशपांडे मायदेशी परतत होते

नागपूर : आठ दिवसांपूर्वीची घटना. दक्षिण कोरिया ते नवी दिल्लीदरम्यानच्या विमान प्रवासात एक प्रवासी अचानक कोसळला. व्यक्तीची प्रकृती अधिकच बिघडणार होती. त्यांच्यासाठी हॉंगकॉंग येथे विमान उतरवण्याची घोषणा झालीही. परंतु, नागपूरच्या एका डॉक्‍टरने आपल्या कर्तव्याला जागत त्या रुग्णावर विमानातच उपचार करीत त्याचे प्राण वाचविले. त्या देवदुताचे नाव आहे, डॉ. अभिनव देशपांडे. 

विमान हवेत असतानाच एक व्यक्‍ती अत्यवस्थ झाला आणि विमानात डॉक्‍टर आहेत का? अशी विचारणा करण्यात आली आणि नागपूरच्या एका डॉक्‍टरने हात उंच केला. त्या रुग्णाला तपासले. त्याला मूत्रपिशवीचा कर्करोग होता. पिशवीतून लघवी बाहेर येत नसल्याने तो वेदनांनी विव्हळत होता. विमानात असलेल्या मेडिकल किटच्या मदतीने डॉ. देशपांडे यांनी त्या व्यक्तीची वेदनेतून मुक्तता केली. मृत्यूच्या दाढेत असलेल्या त्या व्यक्तीचा जीव वाचवला आणि हॉंगकॉंगला विमान उतरवण्याची वेळच आली नाही. यामुळे नागपूरच्या या डॉक्‍टरवर दक्षिण कोरिया सरकारतर्फे कौतुकाचा वर्षाव झाला. 

गंमतच आहे!- जाहिरात ठरली 'नाकापेक्षा मोती जड'

दक्षिण कोरियात सेवरन्स हॉस्पिटलद्वारे आंतरराष्ट्रीय रोबोटिक्‍स सर्जन्सची परिषद झाली. यात नागपूरचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांची राज्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली होती. रोबोटिक्‍स शस्त्रक्रिया या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. दी विंची एसपी या जागतिक दर्जाच्या रोबोटवर प्रशिक्षणही त्यांनी घेतले.

दक्षिण कोरियातील सेऊल येथून परिषद आटोपून डॉ. देशपांडे मायदेशी परतत होते. विमानात बसले. काही वेळानंतर अचानक एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घोषणा विमानात करण्यात आली. डॉक्‍टर असतील त्यांनी प्राथमिक उपचार करावे, असे सांगण्यात आले. त्या रुग्णाला मूत्रपिशवीचा कर्करोग होता. यामुळे उपचारादरम्यान रक्तस्त्रावाची शक्‍यता होती. ही जोखीम असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. 

अधिक वाचा -  काम नाही, धाम नाही तरीही वाजवारेऽऽ

दरम्यान, विमान हॉंगकॉंगला उतरवण्यात येईल, असे सांगण्यात आले. या काही वेळात मात्र रुग्णाने उपचारासाठी पूर्ण तयारी दर्शविली. यामुळे डॉ. देशपांडे यांनी ही जोखीम स्वीकारत उपचार केले. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव झाला. परंतु, तो थांबवण्यातही त्यांना यश आले. जीव वाचवल्याबद्दल त्यांनी डॉ. देशपांडे यांचे आभार मानले. विशेष असे की, विमानातील प्रत्येक व्यक्तीने "यू आर गॉड फॉर हिम' असे म्हणत डॉ. देशपांडे यांची प्रशंसा केली. दक्षिण कोरियातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

शिक्षण जीव वाचवण्याच्या कामी 
वैद्यकीय शिक्षण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी कामात आले, ही गोष्ट मनाला समाधान देणारी आहे. दिल्लीत विमान लॅंड झाल्यावर त्या व्यक्तीला भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे. 
- डॉ. अभिनव देशपांडे, 
रोबोटिक सर्जन, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur doctor save patient life in plane