मोठी बातमी! आमदार प्रवीण दटके यांनी केला पाणउतारा; महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला हा निर्णय...

राजेश प्रायकर
सोमवार, 13 जुलै 2020

सर्व अधिकारी दुपारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे गेले. या घटनेने संपूर्ण महापालिकेत काम बंद असून नागरिकांच्या सुविधांवरही परिणाम झाला. या घटनेबाबत सहायक संचालक पी. बी. गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध झाले नाही. 

नागपूर : महापालिकेचे नगर रचना सहायक संचालक पी. बी. गांवडे यांचा आमदार प्रवीण दटके यांनी फोनवरून पानउतारा करीत अपमान केल्याप्रकरणी सर्वच अधिकाऱ्यांनी लेखनी बंद केली. त्यामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांनी आयुक्तांना याबाबत तक्रार केली. तसेच महापौर व पालकमंत्र्यांकडेही गाऱ्हाणे मांडले. दरम्यान, आमदार प्रवीण दटके यांनी गावंडे यांची माफी मागितल्याचे सांगितले. 

महापालिकेत सोमवारी सकाळी सर्व अधिकारी कामावर पोहोचले. नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी. बी. गावंडेही त्यांच्या कक्षात पोहोचले. त्याचवेळी आमदार प्रवीण दटके यांनी हुडकेश्‍वर-नरसाळा येथील एका प्लॉटमुळे रस्त्याचे काम रखडल्यावरून गावंडे यांना विचारणा केली. एवढेच नव्हे सहायक संचालक गावंडे यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. मात्र, गावंडे यांनी आयुक्तांसोबत बैठक असल्याचे सांगून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे चिडलेल्या आमदार दटके यांनी गावंडे यांचा पानउतारा केला. यावरून गावंडे यांनी तत्काळ राजीनामा देण्याची तयारी दर्शवित आयुक्तांकडे ही बाब सांगितले. त्यानंतर संपूर्ण महापालिका परिसरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.

जाणून घ्या - पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...

या घटनेने अधिकाऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, सर्व विभागप्रमुख, सर्व सहायक आयुक्तांनी आयुक्तांना निवेदन देऊन काम बंद आंदोलन सुरू केले. यानंतर या अधिकाऱ्यांनी महापौर संदीप जोशी यांचीही भेट घेतली. 

सर्व अधिकारी दुपारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे गेले. या घटनेने संपूर्ण महापालिकेत काम बंद असून नागरिकांच्या सुविधांवरही परिणाम झाला. या घटनेबाबत सहायक संचालक पी. बी. गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध झाले नाही.

क्लिक करा - अमरावती शहरात सर्वत्र शुकशुकाट...नागरिकांमध्ये दहशत... काय आहे कारण

कामाच्या ठिकाणी जाण्यास दिला नकार 
नरसाळा येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यात एक प्लॉट येत असल्याने दोन दिवसांपासून काम बंद आहे. याबाबत नगरसेविका स्वाती आखतकर यांनी मला सांगितले. सहायक संचालक गावंडे यांना फोन लावला. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाण्यास असमर्थता व्यक्त केली. यावरून मी त्यांना बोललो. परंतु त्यानंतर लगेच त्यांची माफी मागितली.  परंतु, त्यांना मी कुठलीही शिवीगाळ केली नाही. 
- प्रवीण दटके, आमदार 

रस्त्यावरील प्लॉटवर बांधकामाची मंजुरी 
न्यू नरसाळा येथे 19 मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु येथे एक प्लॉट असून नगर रचना विभागाने बांधकाम नकाशा मंजुरी दिली. त्यामुळे दोन दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत गावंडे यांना फोन करून प्रत्यक्ष येण्याची सूचना केली. त्यांनी येण्यास टाळले. त्यामुळे शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके यांना घटना सांगितली. 
- स्वाती आखतकर, 
नगरसेविका, प्रभाग 29


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Municipal officials stop writing agitation