आशा सेविकांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त मानधान, नागपूर महापालिकेचा निर्णय

राजेश प्रायकर
Saturday, 10 October 2020

आशा सेविकांना कोविड काळात सेवा दिल्याबाबत एक हजार रुपये प्रति महिना, असे तीन महिन्यांचे मानधन देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दीड हजार प्रति महिना अतिरिक्त मानधन देण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने हिरवा झेंडा दाखवल्याचे स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी नमूद केले

नागपूर : कोरोना काळात सेवेचे अनोखे उदाहरण सादर करणाऱ्या आशा सेविका तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन देण्याच्या निर्णयावर आज स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले. आशा सेविकांना एक हजार रुपये, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दीड हजार प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. 

आशा सेविकांना कोविड काळात सेवा दिल्याबाबत एक हजार रुपये प्रति महिना, असे तीन महिन्यांचे मानधन देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दीड हजार प्रति महिना अतिरिक्त मानधन देण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने हिरवा झेंडा दाखवल्याचे स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी नमूद केले. यामुळे ५९४ आशा सेविका, तर ४०२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तीन महिन्याच्या अतिरिक्त मानधनासाठी ३५ लाख ९१ हजार रुपयांचा खर्च येणार असून याला मान्यता देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत आशा सेविकांची अनेक दिवसांच्या मागणीची पूर्तता करण्यात आल्याचे झलके म्हणाले. आशा सेविकांना हजार रुपये मानधनाबाबत महापौर संदीप जोशीही आग्रही होते. कोविडच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी करीत घरी बसले असताना आशा सेविकांनी जोखीम पत्करून कामे केली. त्यामुळे तीन महिन्यांसाठी त्यांना विशेष भत्ता देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे झलके यांनी सांगितले. 

हेही वाचा - अभिमानास्पद! राजधानीपासून तर उपराजधानीतील शासकीय...

कोविडचा काळ असेपर्यंत वाढीव मानधन - 
सध्या आशा सेविकांना तीन महिन्यांच्या अतिरिक्त विशेष भत्त्याला मंजुरी देण्यात आली. परंतु, कोविडचा काळ असेपर्यंत त्यांची सेवा अविरत सुरू राहणार आहे. त्यामुळे त्यांना कोविडच्या काळापर्यंत विशेष भत्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही झलके यांनी सांगितले. 

हेही वाचा - तांत्रिक लोचा : विद्यापीठाचे सर्व्हर बसले; दावे ठरले फोल

अग्निशमनमधील वाहने, भंगाराचा लिलाव -
अग्निशमन विभागात अनेक वाहने, मशीन व इतर भंगार साहित्य आहे. वाहने व भंगार साहित्याच्या लिलावालाही स्थायी समितीने आज मंजुरी दिली. वाहनांमध्ये तीन लहान अग्निशमन बंब, तीन आपातकालीन अग्निशमन बंब व तीन अ‌ॅम्बुलन्सचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur municipality will give extra honorarium to Asha and contractual employee