एटीकेटी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, विषय नसलेल्या प्राध्यापकांनी तयार केल्या प्रश्नपत्रिका

मंगेश गोमासे
Thursday, 28 January 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना भरभरून गुणदान झाले. मात्र, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयस्तरावर झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे एटीकेटीच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे आदेश देण्यात आले. प्राध्यापकांनी आपल्या विषयांसह दुसऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करीत मूल्यांकनही आटोपल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एटीकेटीच्या परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना भरभरून गुणदान झाले. मात्र, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयस्तरावर झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या ३० हजारांहून अधिक अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालयांच्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यासाठी आवश्यक प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी ही महाविद्यालयांवर होती. अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असून यंदा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्तीही रखडली आहे. त्यामुळे विषय शिक्षक नसताना दुसऱ्याच विषयाच्या शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली. प्रश्नपत्रिका काढणे, त्या महाविद्यालयांना पुरवणे ही जबाबदारी विद्यापीठाची आहे. मात्र, विषय शिक्षकांअभावी कुणालाही प्रश्नपत्रिका तयार करण्याची देण्यात आलेल्या जबाबदारीमुळे परीक्षा कितपत पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील, असा सवाल जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा - खोल पाण्याकडे पाहत घुटमळत होती तरुणी, काही क्षणातच घडलेल्या प्रसंगाने उपस्थितही चक्रावले

प्राचार्य फोरमचाही संताप -
विद्यापीठाने महाविद्यालयांवर परीक्षेची जबाबदारी देत स्वत: मोकळे झाले आहेत. मात्र, सरकारने तासिका प्राध्यापकांची नियुक्ती केलेली नाही तर परीक्षा कशा घ्याव्या हा सवाल महाविद्यालयांसमोर होता. महाविद्यालयांना स्वत:जवळून पैसे खर्च करून तासिका प्राध्यापकांना बोलावून परीक्षा घेण्याची वेळ आल्याची खंत प्राचार्य फोरमने व्यक्त केली. 

हेही वाचा - महापौरांची धडपड, नेत्यांचा विरोध; भाजपमध्ये चाललंय काय?
 
अंतिम वर्षाच्या निकालात विद्यार्थ्यांची गुणपत्रिका बघितल्यास प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण देण्यात आले आहेत. याशिवाय इतर सत्रांची परीक्षा महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आली. यातही पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे पाहावयास मिळते. विद्यापीठाच्या ढिसाळ परीक्षा नियोजनाचा हा परिपाक आहे. 
-केशव मेंढे, विधिसभा सदस्य. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur university senate member take doubt on transparency in atkt exam