नागपुरात आघाडीत बिघाडी : अध्यक्ष, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे, राष्ट्रवादीला ठेंगा

नीलेश डोये
शनिवार, 18 जानेवारी 2020

नुकत्याच झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. गेले साडे सात वर्ष नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता होती. याला आघाडीने एकत्रितरित्या सुरुंग लावला. हा पराभव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का होता.

नागपूर : जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता उलथवल्यानंतर काँग्रेस-राकाँ आघाडी सत्तेवर येणार अशी अपेक्षा होती. मात्र, अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत राष्ट्रवादीला ठेंगा दाखविला आहे. शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्‍मी बर्वे व उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अखेरच्या क्षणी सर्व समीकरण बदलल्याचे दिसले.

नुकत्याच झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. गेले साडे सात वर्ष नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता होती. याला आघाडीने एकत्रितरित्या सुरुंग लावला. हा पराभव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का होता. ही निवडणूक काँग्रेस व राकाँने सोबत लढल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळेल असा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही.

शनिवारी (ता. 18) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया दुपारी 1 वाजता सुरू झाली. दुपारी 3 वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी केवळ एक अर्ज आल्यामुळे रश्‍मी बर्वे यांची बिनविरोध निवड झाली. तर राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर कोल्हे व दिनेश बंग यांनी अर्ज दाखल केला होता, त्यांनी नंतर माघार घेतली. भाजपकडून दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

- ते तिघे निघाले होते बाजाराला, रेल्वेने चिरडले त्यांना
 

अध्यक्षपदासाठी होते चार दावेदार
कॉंग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चार महिला उमेदवारांचा दावा होता. यामध्ये पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी सर्कलच्या रश्‍मी बर्वे, भिवापूर तालुक्‍यातील नांद सर्कलच्या नेमावली माटे, नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील सोनेगाव निपाणी सर्कलच्या भारती पाटील व बेसा सर्कलच्या मेघा मानकर यांचे नाव होते.  बर्वे केदार गटाच्या सांगण्यात येते. तर, माटे मुळक यांच्या समर्थक आहेत. या दोन्ही नेत्यांकडून आपापल्या समर्थकासाठी लॉबिंग सुरू होती. अखेर केदार गटाच्या बर्वे यांनी बाजी मारली.

- तीन कार समोरासमोर धडकल्या; आठ जखमी
 

काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही : अनिल देशमुख
आम्ही ही निवडणूक एकत्रितपणे लढलो. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळायला हवे होते. मात्र काँग्रेसने आघाडीचा धर्म पळाला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur z p president election