"ते' तिघे निघाले होते बाजाराला, रेल्वेने चिरडले त्यांना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

मृत कामगार हे बुटीबोरीनजीकच्या लॉ कॉलेजच्या बांधकामावरील कामगार म्हणून कामाला होते. शुक्रवारी बुटीबोरी येथे आठवडी बाजार असतो. त्याकरिता कामगार बुटीबोरीकडे येत होते. मात्र, बाजार करण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. 

बुटीबोरी (जि.नागपूर)  : आठवडी बाजार करण्यासाठी निघालेल्या तीन कामगारांना रुळ ओलांडताना रेल्वेने चिरडल्याने खळबळ उडाली आहे. बुटीबोरी पोलिस हद्दीतील गोदावरीनगरनजीकच्या रेल्वेरुळावर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

क्‍लिक करा :"ती' ऐकत होती हेडफोनवर गाणे, मृत्यू करीत होता "तिची' प्रतीक्षा 

तिन्ही मार्गावर एकाचवेळी आल्या गाड्या 
शारदा शेखलाल सयाम (19), कमलेश गोधनलाल मरसकोल्हे (22) आणि योगेश उईके (20, तिन्ही रा. मुराही टोला, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. गोदावरीनगर येथून एकूण तीन रेल्वे मार्ग जातात. एकाच वेळी तिन्ही मार्गावरील एकाच वेळी गाड्या आल्याने कामगारांचा गोंधळ उडला. घाबरल्याने त्यांचा तोल गेला आणि काही कळायच्या आत रेल्वे त्यांना चिरडून पुढे गेली. यानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. 

क्‍लिक करा : रानडुकराने केला हल्ला, युवती पळाली, विहिरीत पडली 

रेल्वे अचानक पाहून घाबरले, भांबावले 
गोदावरीनगर येथे मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्याला आहेत. बाजारासाठी ते नेहमीच रूळ ओलांडून जात असतात. रूळ ओलांडणे नित्याचेच असल्याने आपसांत गप्पा मारत ते जात होते. एकाचवेळी तिन्ही मार्गांवर गाड्या येतील याची कल्पनाही त्यांना नव्हती. समोरून धडधडत रेल्वे येत असल्याने बघून त्यांचा थरकाप उडाला. नेमके काय करावे, हे त्यांना सुचेनासे झाले होते. रूळ ओलांडण्याच्या मनःस्थितीत असताना समोरच्याही मार्गावरूनही गाडी येताना त्यांना दिसली. त्यामुळे ते अधिकाच घाबरले. काही सुचायच्या, करायच्या आतच त्यांना रेल्वेने धडक दिली. अपघाताचे वृत्त परिसरात झपाट्याने पसरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक आसिफफराजा शेख, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मिलिंद नांदूरकर, सतेंद्र रंगारी, संजय बांते, विनायक सातव, खुशाल शेगोकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची नोंद करून पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत. 

बाजार करण्यापूर्वीच मृत्यूने गाठले 
मृत कामगार हे बुटीबोरीनजीकच्या लॉ कॉलेजच्या बांधकामावरील कामगार म्हणून कामाला होते. शुक्रवारी बुटीबोरी येथे आठवडी बाजार असतो. त्याकरिता कामगार बुटीबोरीकडे येत होते. मात्र, बाजार करण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They were leaving the market, the railway crushed them