पैसे परत मिळेचिना! विद्यापीठाचा दावा खोटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पैसे परत करण्याचा निर्णय विद्यापीठात अस्तित्वात असून विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करावयाचा असल्याचे सांगितले. त्यामुळे असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. विद्यार्थ्यांनी अर्ज करून अकाउंट नंबर द्यावा. त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. 
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू. 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने फेरमूल्यांकनात गुणांमध्ये वाढ झाल्यास मूल्यांकनाचे पैसे परत करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतली होता. मात्र, अद्याप एकाही विद्यार्थ्याला पैसे परत केले नसल्याचे विद्यापीठाच्याच लेखा विभागाच्या माहितीतून पुढे आले आहे. 

अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहितीच्या अधिकारात विभागाला तसे कुठलेच आदेश नसल्याचे लेखा विभागाकडून कळविण्यात आल्याने कुलगुरूंच्या निर्णयाला केराची टोपली दाखविली की काय? असाच प्रश्‍न आहे. विद्यापीठात दरवर्षी उन्हाळी आणि हिवाळी या दोन सत्रात परीक्षा घेतली जाते. जवळपास 1200 विषयांमध्ये 3 लाखावर विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होत असतात.

गेल्या काही वर्षात विद्यापीठाचा निकालाचा वेग वाढला आहे. मात्र, निकालानंतर फेरमूल्यांकन करणाऱ्यांचीही संख्या तशीच वाढत जात असल्याचे दिसून येते. जवळपास दरवर्षी 20 हजार ते 45 हजारांवर विद्यार्थी प्रत्येक सत्रात फेरमूल्यांकनासाठी अर्ज करताना दिसून येतात. यासाठी विद्यापीठाकडून उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍ससाठी 350 रुपये तर मूल्यांकनाला चॅलेंज करण्यासाठी 150 असे एकूण साडेचारशे रुपये आकारण्यात येतात. विद्यापीठाला परीक्षा शुल्कातून दरवर्षी जवळपास 66 कोटींचा निधी मिळतो. त्यात फेरमूल्यांकनातून 2018-19 या वर्षात 1 कोटी 66 लाख 92 हजार 767 निधी प्राप्त झाला आहे. दरवर्षी जवळपास याच प्रमाणात निधी विद्यापीठाला मिळत असते. एकूण निधीच्या तुलनेत हा निधी एक टक्का असल्याचे सांगून यापूर्वीच फेरमूल्यांकनात गुण बदलणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे परत करण्याची घोषणा कुलगुरूंनी सिनेटमध्ये केली होती.

नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

याशिवाय व्यवस्थापन परिषदेमध्येही या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, खुद्द कुलगुरूंनी आदेश दिल्यावरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे 2016 पासून 2019 पर्यंत 2 लाख, 14 हजार 947 विद्यार्थ्यांनी केलेल्या फेरमूल्यांकनातील किमान 1 ते 5 टक्के विद्यार्थ्यांचे शुल्क परत मिळालेले नसल्याचे दिसून येते. याउलट 3 कोटी 30 लाखांचे शुल्क उकळले आहे. 

दृष्टिक्षेपात अर्जसंख्या (फेरमूल्यांकन) 
वर्ष - उन्हाळी - हिवाळी 
2016 - 11,116- 27,858 
2017- 23,770 - 29,544 
2018 -38,996 - 45,159 
2019 - 45,550- ... 

मिळालेला निधी 
2016-17 - 47,66,404, 
2017-18- 1,15,53,657 
2018-19 - 1,66,92,737 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagur, university, money, revaluation, vc