"तू पुलिस को लेकर आता है, मुखबीर है क्‍या, असे म्हणत "त्याने' रागात केले हे कृत्य...

"तू पुलिस को लेकर आता है, मुखबीर है क्‍या, असे म्हणत "त्याने' रागात केले हे कृत्य...

कामठी (जि.नागपूर) : "तू पुलिसको क्‍यो लेकर आता है, तू पोलिस का मुखबीर है' असे म्हणत चिडलेल्या आरोपींनी स्वेच्छासेवक असलेल्या तरूणाशी हुज्जत घातली व शिवीगाळ करून मारहाणही केली. मध्ये वाद सोडविण्याकरीता आलेल्या तरूणाच्या वडिलांच्या बोटाला चावा घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

युवकाची केली होती स्वेच्छासेवक म्हणून नियुक्‍ती
कामठीच्या भोईपुरा परिसरात पोलिस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 5 यांनी 16 एप्रिलला शहानिशा करून कोरोना कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असल्याने महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 21(1)अन्वये नवयुवकाची विशेष पोलिस अधिकारी, स्वेच्छासेवक म्हणून नियुक्ती केली. ही बाब जरी स्वागतायोग्य असली तरी या विशेष पोलिस अधिकाऱ्यांना, स्वेच्छासेवकांना पोलिसांची मदत मिळत नसल्याचे भोईपुरा भागातील घटनेवरून दिसून येते. या प्रकरणातील काही आरोपी हे अवैध धंदे करणारे आहेत. या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना असे वाटत असे की हा विशेष पोलिस अधिकारी म्हणून सांगणारा पोलिसांचा खबरी आहे. या अवैध धंदे करणाऱ्याचे पोलिसांशी साटेलोटे असते हे काही नवीन गोष्ट नाही. मात्र, या स्वेच्छासेवकांनी अशा वेळी पोलिस खात्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे काय, पोलिसांनी यांना मदत करणे गरजेचे नाही काय, असे अनेक प्रश्न या घटनेवरून निर्माण झाले.

फिरणा-यांना घरी जाण्यास सांगण्याचे निमित्त
22 एप्रिलला स्वेच्छासेवक सुलतान खान हे पोलिस विभागाद्वारे शहरात फिरविण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकर सोबत ऑटोतून सूचना देत फिरत होते. त्यांनी फिरणाऱ्यांना घरात जाण्यास सांगितले. सोबत असलेल्या होमगार्डवर आरोपींनी अश्‍लील शब्दाचा प्रयोग केला. त्यावर सुलतान यांनी पुन्हा त्यांना घराकडे जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी "तू पुलिसको क्‍यो लेकर आता है, तू पोलिस का मुखबीर है' असे म्हणत वाद करून मारहाण केली. मुलाला वाचविण्यास आलेल्या वडिलालासुद्धा मारहाण करण्यात आली. सुलतानच्या वडिलांना वैद्यकीय तपासणीकरिता मेयो रुग्णालयात पाठविले होते. या संदर्भात जुनी कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपसी वादातून भांडण झाले असल्याचे सांगितले. या प्रकरणातील आरोपी अमजद खान उर्फ गुड्डू युनूस खान(27), शाहरुख खान युनूस खान (22), सरफराज शेख इस्माईल (18), शेख परवेज शेख रशीद (21), शेख शाकीर शेख इस्माईल(22) या पाचही आरोपींना अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

आमचा गुन्हा काय?
स्वेच्छासेवक म्हणून काम करत असताना आरोपींना खबरी असल्याचा गैरसमज झाल्याने मला व माझ्या वडिलाला मारहाण करण्यात आली आहे. परंतु, अशा वेळी पोलिसांनी आम्हाला मदत करणे अपेक्षित होते. मुख्य आरोपीवर फक्त आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत 188 अन्वये कार्यवाही करून सोडण्यात आले.
सुलतान खान
तक्रारकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com