नायलॉन मांजाने मुलाचा कापला गळा; नागपूरच्या मानकापुरातील घटना; बंदीनंतरही सर्रास विक्री

अनिल कांबळे 
Wednesday, 30 December 2020

मानकापुरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे विद्यार्थ्याचा गळा कापल्या गेला. गंभीर जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य संतोष भारद्वाज (१७, शकीलनगर, गोधनी) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.

नागपूर ः नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली असताना दुसरीकडे महापालिकेची रोज कारवाई सुरू असतानाही नायलॉन मांज्याने एक विद्यार्थ्यांच्या गळा कापला. सध्या तो गंभीर जखमी असून त्याच्यावर एका खाजगी इस्पितळामध्ये उपचार सुरू आहे.

मानकापुरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे विद्यार्थ्याचा गळा कापल्या गेला. गंभीर जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य संतोष भारद्वाज (१७, शकीलनगर, गोधनी) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी १० वाजता शकीलनगर, गोधनी येथे राहणारा आदित्य संतोष भारद्वाज हा १२ व्या वर्गातील विद्यार्थी बाईकने एमएससीआयटीच्या क्लासला जात होता. 

हेही वाचा - शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर

गोधनी - मानकापूर रोडवरील दोसा कॉर्नरपुढे नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला गुंडाळल्या गेला. दुचाकी वेगात असल्यामुळे गळा कापला गेला आणि तो गाडीवरून पडला. जखमी झालेल्या संतोषला नागरिकांनी तत्काळ गोधनी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला मानकापूर चौकातील अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये भरती केले. आदित्यच्या गळा जास्तच चिरला गेल्याने तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. तो अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

मांज्याची सर्रास विक्री

संक्राती जवळ आली असून मांजा आणि पतंग विक्रीचा बाजार सजला आहे. जुनी शुक्रवारी आणि इतवारीत सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. दुकानासमोर दुसरा मांजा विक्रीला ठेवला जातो. ग्राहकाने इशारा केल्यास हवा तेवढा नायलॉन मांजा मागच्या दाराने उपलब्ध करून दिला जात आहे. या मांजाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे. 

नक्की वाचा - Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली...

अनिल सोले महापौर असताना मांजाची विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयानेसुद्धा नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. प्रत्यक्षात या बंदीची अंलबजावणी होताना दिसत नाही. महापालिकेचे पथक रोज कारवाई करीत असल्याचा देखावा करीत आहेत. प्लास्टिकच्या पतंग जप्त केल्या जात आहे. थातूरमातूर कारवाई करून नायलॉन मांजा विक्रेत्यांना अभय दिल्या जात आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neck of man cut by nailon string in nagpur breaking news