‘कृषीभूषण’ सुधाकरराव कुबडे यांचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग; आत्मनिर्भर होण्याचा सल्ला

The new ideal of self sufficient farming
The new ideal of self sufficient farming

नागपूर : नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्याची प्रेरणा घेतली. अस्थिरतेच्या काळातही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मिळविणे व आठ ते दहा जणांचे कुटुंब चालविणे हे महाजिकरीचे काम. नेमके तेच कुबडे कुटुंबीयांनी सिद्ध केले आणि तोच ‘फार्म्यूला’ त्यांच्या उत्कृष्ट शेतीचे गमक ठरला. बारोमास तोट्याची शेती होत असल्याची ओरड करीत बसण्यापेक्षा नवनवीन प्रयोग करून फायद्याची शेती करण्यासाठी सेलू (तालुका कळमेश्‍वर) येथील कुबडे कुटुंबीय स्वतः शेतात अहोरात्र राबत आहेत. या नैसर्गिक शेतीतून त्यांचे कुटुंब स्वयंपूर्ण झाल्याचे ते सांगतात आणि इतरांनाही आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देतात.

शेतकऱ्यांच्या मागे लागलेले सतराशे साठ विघ्न आणि त्यावर मात करता येण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणारे काही शेतकरी अशा नैसर्गिक वा सेंद्रिय उत्पादन पद्दतीने दर्जेदार पीक घेऊन सगळ्यांना याकडे आकर्षित करीत आहेत. त्यापैकी कळमेश्‍वर तालुक्यातील सेलू येथील सुधाकरराव कुबडे या शेतकऱ्याने तर उपयोगीतेतून शेतीचे अर्थशास्त्रच बदवून टाकले आहे.

अस्थिरतेच्या काळात कळमेश्‍वर तालुक्यातील गोंडखैरीपासून नजीकच असलेल्या सेलू येथील कुबडे कुटुंब मात्र न परवडणाऱ्या शेतीच्या काळातही वेगळेवेगळे प्रयोग करून शेतीतून इतरांनाही नैसर्गिक संसाधनावर आधारित शेती करण्यात प्रोत्साहन देत आहेत.

सेंद्रीय शेतीतून पिकविलेल्या पालेभाज्यांची शेती करून ते रसायणमुक्त शेती करण्याचा अनेकांना संदेशही देत आहेत. सुधाकरराव कुबडे यांना राज्य सरकारचा २०१७ या वर्षीचा ‘कृषीभूषण’ पुरस्कार मिळाला आहे. ते हाडाचे कास्तकार आहेत हे सांगायला नकोच.

‘झिरो बजेट’ शेतीचे पुरस्कर्ते सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन ‘झिरो बजेट’ शेतीबरोबरच सेंद्रीय शेतीचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. पाळेकरांच्या शिबिरात त्यांना ‘झिरो बजेट’ची संकल्पना भावली. आज त्यांचे किमान सहा ते सात जणांचे कुटुंब शेतीत अहोरात्र राबत आहे. त्यासाठी त्यांना तत्कालिन कृषी अधिकारी हेमंतसिंग चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

शासनाच्या अनुदानातून गटाच्या माध्यमातून त्यांनी शेतीचा हा ‘फार्म्यूला’ राबविण्याचा संकल्प करून त्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. सात एकरात त्यांच्याकडे पपई, संत्रा, मोसंबी, केळी, पेरू, सिताफळ व पालेभाज्या अशी विविध पिकांनी बहरलेली त्यांची बाग त्यांच्या घामाची पावती देते. त्यांच्याकडे काही गाई, बैल ही जनावरे आहेत. त्या जनावरांपासून मिळणाऱ्या नत्रापासून खते व औषधी तयार करून शेतातील पिकांना देतात. त्याचा उत्तम परिणाम झाल्याचे पिकाच्या एकंदर प्रगतीवरून लक्षात येते.

जनावरांच्या विष्ठेपासून तयार केलेली उत्तम खते पिकांना दिल्यास दर्जेदार फळे व पालेभाज्या पहायला मिळतात. गांडुळ खत घरीच तयार करून ते पिकांना देतात. त्यामुळे रासायनिक खतांऐवजी या खतांचा चांगला परिणाम दिसून येतो. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा हा प्रयोग सुरू आहे. त्या पालेभाज्यांना बाजारात भरपूर मागणी आहे.

प्रत्येक माल ५० रुपये या प्रतिकिलो दराने विकला जातो

नागपुरातील अभ्यंकरनगरात ते गावावरून पालेभाज्या, फळे आणून विकतात. दिवसभर नव्हे तर तासाभरात त्यांचा मेटॅडोअर पाहता पाहता खाली होतो. १५ रुपये डझनप्रमाणे नागपुरात विकली जाणारी संत्री ते दिल्लीच्या व्यापाऱ्यांना ५० रुपये प्रति डझन विकत असल्याचे सांगतात. त्यांच्याकडे बाराही महिने प्रत्येक माल ५० रुपये या प्रतिकिलो दराने विकला जातो. सर्व प्रयोगातून ते चांगली कमाई करीत असल्याचे सांगतात. याशिवाय ते गिर गायीचा उपक्रम राबवीत असल्याचे सांगतात. त्या गाईचे शुद्ध दूध ते ७० रुपये लिटर या दराने विकतात. पुढे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याचे त्यांचे चिरंजिव संदीप कुबडे यांचे स्वप्न आहे.

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून करा शेती
मी नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून सेंद्रिय किंवा झिरो बजेट शेतीचा प्रयोग करून शुद्ध लाभ कमवित आहे. शेतीचा व्यवसाय नफ्याचा नसतो किंवा यात तोटाच फार होतो, असे सांगणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की काळाबरोबर आता तुम्हालाही बदलावे लागेल. रासायनिक शेती करण्यापेक्षा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती केल्यास तुम्ही फायद्याची शेती करून सुखी होऊ शकता. माझ्यासारखा प्रयोग कुणी करून शेती करीत असेल तर मी त्यांच्याकडून ३० रुपये किलो या दराने माल विकत घ्यायला आजच तयार आहे.
- सुधाकर कुबडे,
प्रयोगशील शेतकरी, सेलू, ता. कळमेश्‍वर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com