निम्म्यापेक्षा कमी महाविद्यालये "नॅक'शिवाय 

मंगेश गोमासे 
रविवार, 29 डिसेंबर 2019

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयाच्या दर्जासाठी "नॅक' मूल्यांकन करणे आवश्‍यक ठरविले आहे. आता "नॅक'चे मूल्यांकन हे अनुदानाशी जोडल्याने शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांना "नॅक'चे मूल्यांकन करणे गरजेचे ठरते.

नागपूर : उच्च शिक्षणाच्या दर्जात वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना आवश्‍यक सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सर्व महाविद्यालयांना "नॅक' मूल्यांकन बंधनकारक केले आहे. असे असताना, राज्यातील जवळपास निम्म्या शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅककडून मूल्यांकन करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयाच्या दर्जासाठी "नॅक' मूल्यांकन करणे आवश्‍यक ठरविले आहे. आता "नॅक'चे मूल्यांकन हे अनुदानाशी जोडल्याने शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांना "नॅक'चे मूल्यांकन करणे गरजेचे ठरते. असे असताना, काहीच महाविद्यालयांनी "नॅक'चे मूल्यांकन केल्याचे दिसते. यात "नॅक' मूल्यांकन केलेल्या राज्यातील शासकीय व अनुदानित महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. 

राज्यात एकूण 28 शासकीय महाविद्यालये आहेत. त्यातील 23 महाविद्यालयांचे "नॅक' मूल्यांकन झाले आहे. मात्र, मुंबई विभागातील 3, नागपूर व औरंगाबाद विभागातील प्रत्येकी 1 अशा पाच शासकीय महाविद्यालयांचे अद्याप "नॅक' मूल्यांकन झालेले नाही. याशिवाय 1 हजार 837 विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी केवळ 181 विनाअनुदानित महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेतले आहे.

त्यात अमरावती, औरंगाबाद, नांदेड आणि सोलापूर या विभागांतील बोटावर मोजता येतील एवढ्या महाविद्यालयांनी मूल्यांकन केले आहे. या प्रकाराने एकीकडे महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अनुदान आयोगाने "नॅक'चे मूल्यांकन असल्याशिवाय योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे धोरण निश्‍चित केल्याने भविष्यात येथील विद्यार्थ्यांचे नुकसानही होण्याची भीती आहे. 
 

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर
 

संख्या वाढविण्यासाठी पुढाकार

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये "नॅक' पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांची संख्या जेमतेम आहे. ही संख्या वाढविण्यासाठी आता कुलगुरूंनी कंबर कसली आहे. महाविद्यालयांमध्ये "नॅक'साठी आवश्‍यक माहिती आणि त्याबद्दलची भीती दूर करण्यासाठी लवकरच चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यातील विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये "नॅक' असलेल्या महाविद्यालयांची संख्या कमी आहे.

गुणवत्ता वाढविण्यासाठी महाविद्यालयांनी "नॅक' मूल्यांकन करावे, असे निर्देश आहेत. मात्र, अनेक महाविद्यालयांमध्ये त्यासाठी आवश्‍यक असलेला शिक्षक व कर्मचारी वर्ग नसल्याचे चित्र आहे. अशी महाविद्यालये "नॅक'साठी पात्रच ठरत नाही. अशी संख्या बरीच असल्याने आकडा मोठा दिसून येतो. मात्र, संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about nagpur university