तब्बल २०० सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी पाठवले नोकरीवरून काढल्याचे पत्र; सणांच्या तोंडावर कुटुंबाचे होणार हाल

राजेश प्रायकर 
Saturday, 17 October 2020

मागील वर्षी नोव्हेंबरपासून एजी एन्व्हायरो कंपनीकडे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील घरांतून कचरा गोळा करण्याची जबाबदारी महापालिकेने दिली.

नागपूर ः शहरातील घराघरांतून कचरा संकलन करणाऱ्या एजी एन्व्हायरो कंपनीने नोकरीवरून काढल्याचे पत्र थेट घरी पाठविल्याने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांतही नैराश्य पसरले आहे. ऐन सणासुदीत नोकरी गेल्याने दोनशे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी अंधारात जाणार आहे. नोकरीवरून काढण्यापर्यंतच कंपनी थांबली नाही तर कॅव्हेट दाखल करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासही सुरुवात केली.

मागील वर्षी नोव्हेंबरपासून एजी एन्व्हायरो कंपनीकडे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील घरांतून कचरा गोळा करण्याची जबाबदारी महापालिकेने दिली. यापूर्वी कचरा उचल करणाऱ्या कनक रिसोर्सेसच्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावर घेतले. गेल्या पंधरा वर्षापासून घराघरांतून कचऱ्यांची उचल करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वर्षभरातच नोकरीवरून काढण्याचा प्रताप एजी एन्व्हायरोने केला. 

हेही वाचा - चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन, विधवा महिला अलिशान बी. ने घेतले विक्रमी उत्पादन

एजी एन्व्हायरोने कर्मचाऱ्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबावतंत्र सुरू केले. कर्मचाऱ्यांनी दबावतंत्राला भीक न घातल्याने इरेस पेटलेल्या एजीने त्यांच्या घरच्या पत्त्यावरच नोकरीवरून काढल्याचे पत्र पाठविले आहे. 

एकूण १८० कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे नोकरीवरून काढल्याबाबत पत्र पाठविण्यात आल्याचे एका कर्मचाऱ्याने नमूद केले. नोकरीवरून काढल्यानंतर कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने औद्योगिक न्यायालयात कॅव्हेट दाखल केला. आधीच नोकरी गेल्याने नैराश्य आलेल्या कर्मचाऱ्यांचे कॅव्हेट दाखल करून मानसिक खच्चीकरणही कंपनीने सुरू केल्याचे दिसून येत आहे. ऐन सणासुदीत नोकरीवरून काढल्याने दिवाळी कशी साजरी करणार? मुलांसाठी खरेदी कशी करणार? अशा अनेक प्रश्नांनी कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

कचरा संकलन ठप्प पडणार

तूर्तास लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील घरातून कचरा संकलन सुरू आहे. मात्र, काढलेल्या कर्मचाऱ्यांना बघता इतर कर्मचाऱ्यांच्याही आत्मविश्वासाला धक्का बसला. पुढे काही दिवसांत यातील काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचीही तयार केली. त्यामुळे शहरातील पाच झोनमधील कचरा संकलन बंद होऊन घराघरांत कचरा साचण्याची शक्यता आहे.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

कचरा संकलनाच्या गाड्यांची गर्दी

घराघरांतून कचरा संकलन करणाऱ्यांना वाहनांची देखभाल दुरुस्ती ग्रेट नाग रोडवरील कारखाना विभाग करीत आहे. नोकरी गेलेल्यांमध्ये चालकही असून अनेक कचरा संकलन वाहने कारखाना विभागापुढे उभ्या दिसून येत आहे. या वाहनांच्या गर्दीमुळे एखादा अपघात होण्याची शक्यताही बळावली. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NG company send termination letter to 200 employees at home