तुम्ही पैसे गुंतवा, नफ्यातून पंधरा टक्के कपात करून रक्कम परत मिळेल’ अशी बतावणी करून फसवणूक

अनिल कांबळे
Monday, 16 November 2020

ते आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजताच अतुल आणि रमेश यांनी फिर्यादीला विजय गुरनुले यांच्या कार्यालयात घेऊन गेले. ९ जुलै २०२० ला फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाचे प्रत्येकी ९३ हजार रुपये असे दोन पॅकेज गुंतवणूक केली. त्यानुसार त्यांना दर आठवड्याला १० हजार ६१८ रुपये मिळाले. एवढी रक्कम २० आठवडे कंपनी देणार होती.

नागपूर : गुंतवणूक केल्यानंतर खूप फायदा होईल, असे आमिष दाखवून शहरातील गुंतवणूकदारांची १९ लाख ३५ हजारांनी फसवणूक केली आणि कार्यालय बंद करून फरार झाले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, यातील मुख्य सूत्रधार विजय गुरनुले (रा. प्रतापनगर) अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय गुरनुले आहे. याच्या सोबत आरोपी जीवनदास डंडारे (रा. जयताळा), अतुल मेश्राम (रा. अमरनगर) आणि रमेश बिसेन (रा. वानाडोंगरी) होते. त्यांनी त्रिमूर्तीनगरातील मंगलमूर्ती चौकात मेट्रो विजन बिल्डकम व रिअर ट्रेड कंपनी या नावाने २०१५ मध्ये कार्यालय सुरू केले. गुंतवणूक आणि फसवणुकीचा प्रकार २०२० मध्ये झाला.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू

जयताळा निवासी फिर्यादी गणेश चाफले (३९) यांच्या पत्नीच्या नात्यातील आरोपी जीवनदास डंडारे हा फिर्यादीच्या घरी गेला. फिर्यादीला गुंतवणूकसंबधी माहिती सांगितली. फिर्यादीच्या पत्नीच्या नावे भूखंड असल्याची माहिती जीवनदासला मिळाली. यानंतर आरोपी अतुल मेश्राम व रमेश बिसेन यांनी वारंवार फोन करून फायदा बाजार बिजनेस विषयी जून २०२० मध्ये माहिती दिली.

तुम्ही पैसे गुंतवा. झालेल्या नफ्यातून १५ टक्के कपात करून तुम्हाला प्रत्येक आठवड्याला रक्कम परत मिळेल अशी माहिती दिली. ते आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजताच अतुल आणि रमेश यांनी फिर्यादीला विजय गुरनुले यांच्या कार्यालयात घेऊन गेले. ९ जुलै २०२० ला फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाचे प्रत्येकी ९३ हजार रुपये असे दोन पॅकेज गुंतवणूक केली. त्यानुसार त्यांना दर आठवड्याला १० हजार ६१८ रुपये मिळाले. एवढी रक्कम २० आठवडे कंपनी देणार होती.

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

९ आठवडे नियमित रक्कम मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यामुळे फिर्यादीने एकून ११ लाख ३५ हजार रुपये गुंतविले. यांना मिळणारी रक्कम पाहून त्यांचे शेजारी तेजराव झगडे यांनी ६ लाख रुपये, फिर्यादीचे मित्र राजेश कराडे व त्यांचे इतर मित्र यांनी २ लाख रुपये असे एकून १९ लाख ३५ हजार रुपयांची कंपनीत गुंवणूक केली.

२८ सप्टेंबर २०२० ला गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी काही गुंतवणूकदारांना अर्धी रक्कम दिली व काहींना भ्रमणध्वनीवर मॅसेजव्दारे कळविले की, कंपनीत सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तुम्हाला तुमची रक्कम नंतर देण्यात येईल. फिर्यादी कार्यालयात गेले असता कुलूप दिसले. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींना कळले होते. प्रतापनगरपोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nineteen lakh fraudulent investors in Nagpur