सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या भागांच्या विकासामुळे देश स्वावलंबी होणे शक्य - गडकरी

राजेश चरपे
Tuesday, 20 October 2020

आयातीला पर्याय निर्माण होऊन निर्यातीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. सात लाख कोटींच्या इंधनाची आयात कमी कशी करता येईल, यासाठी पर्याय समोर येणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.

नागपूर : स्वदेशीचा आधार घेऊन तंत्रज्ञानाचा विकास करीत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागाचा विकास करून देश स्वावलंबी होऊ शकतो. तसेच विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करून ते गावांमध्ये पोहोचावे आणि गावांचा विकास व्हावा. यातूनच आयातीला पर्याय निर्माण होईल व देश स्वावलंबी होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ

स्वदेशी जागरण मंचातर्फे काही उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक डॉ. मनमोहन वैद्य हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपला उद्योग-व्यवसाय हा एक परिवार आहे, अशी संकल्पना दत्तोपंत ठेंगडी यांनी रुजवली होती. व्यवसायातून पैसा कमावला पाहिजे. पण आपल्यासोबत काम करणारे हा एक परिवार आहे, या सामाजिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. आमच्यावर जे संस्कार झाले ते दत्तोपंतांमुळे झाले. त्यांनी दिलेले सामाजिक चिंतन, समन्वयाचा विचार आणि देशाची आर्थिक व्यवस्था कशी मजबूत होईल, अशी त्यांची भावना होती, असे गडकरी म्हणाले. 

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

आयातीला पर्याय निर्माण होऊन निर्यातीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. सात लाख कोटींच्या इंधनाची आयात कमी कशी करता येईल, यासाठी पर्याय समोर येणे आवश्यक आहे. जैविक इंधनाची निर्मिती आणि त्याचा वापर हाच त्यावर स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे नेणारा पर्याय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत आपण टिकावे, आपले उत्पादन वाढावे, उत्पादन खर्च कमी व्हावा, उत्पादनाचा दर्जा उत्तम असावा, किंमत कमी असावी, वाहतूक खर्चात बचत व्हावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, यामुळे आपण निर्यात वाढवू शकू व आर्थिक युद्धात टिकून राहू शकू, असे गडकरी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadkari about development of bakcward area