माजी शिक्षण सभापतींच्या या मॉडेलमुळे होणार नाही विद्यार्थ्यांचे नुकसान...काय आहे वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

`कोरोना'चे संकट गडद असताना, शाळा 26 जूनला शाळा सुरू करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहे. मात्र, शाळा दोन महिने उशिरा म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुरू केल्या तरी विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे मत महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी `सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे. कसे ते बघा...

नागपूर  : वर्षभरात 365 दिवस असतात. त्यापैकी 165 दिवस सुट्यांचे असतात. 200 दिवस शाळा होते. त्यामुळे आणखी काही महिने वाट बघावी. शाळा सुरू करण्याची एवढी घाई करू नये. शालेय मुलांमध्ये एकदा का संसर्ग झाला तर तो नियंत्रित करणे अवघड होईल, असे मत नागपूर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी व्यक्त केले. गोपाल बोहरे यांनी त्यांच्या शिक्षण सभापतीपदाच्या कार्यकाळात अनेक प्रयोग केले. त्यामुळे मनपाच्या शाळा चर्चेत आल्या होत्या.

गोपाल बोहरे यांनी केलेल्या प्रयोगामुळे नागपूर शहरातील मनपाच्या शाळा चांगल्याच चर्चेत आल्या. शिक्षण सभापती म्हणून त्यांनी शहराचे लक्ष वेधून घेतले. परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने तिकिट मिळाले नाही. त्यामुळे ते नगरसेवक होऊ शकले नाहीत. ते नगरसेवक झाले असते तर, त्यांच्या शिक्षणविषयक प्रयोगशिलतेमुळे त्यांच्याकडेच शिक्षण सभापतीपद चालून आले असते. त्यामुळे आज नागपूर महानगरपालिच्या शाळा जशा दिसतात, त्यामध्ये आणखी सकारात्मक सुधारणा झाली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी शिक्षणाबाबत त्यांना वाटत असलेल्या आस्थेपोटी त्यांनी खास `सकाळ'ला भेट देत त्यांनी शाळा कधी सुरू करायच्या याबाबत सविस्तर आराखडाच मांडला. 

हेही वाचा - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून

सध्या कोरोनामुळे शाळांनी ऑनलाइन क्‍लासेसला सुरुवात केली आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये कुठे ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे काय? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बऱ्याच शाळांमध्ये नेटवर्क नाही. शिवाय येथील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत का?, असल्यास कुटूंबात एकच मोबाईल, तोही अँड्राईड असेल का? असे अनेक प्रश्‍न आहेत. मग हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील काय? असा प्रश्‍न निर्माण होतो.

वर्षभरात दोनशे दिवस शाळा असते. त्यामुळे मार्चपासून शाळा बंद ठेवल्यावर सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू केल्यास, सरकारला उपाययोजना करण्यास बराच कालावधी मिळतो. या कालावधीत शाळा सॅनिटाईझ करणे, त्यात सोयी-सुविधा देणे आणि आरोग्यविषयक माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, आताच शाळा सुरू केल्यास सोशल डिस्टंन्सिग आणि आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. कारण प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांना केवळ घरीच कसा काय अभ्यास करता येईल, याबाबत शिक्षकांनी सांगावे जेणेकरुन त्यांच्या शिक्षणाची गोडी कायम राहील.

ठळक बातमी - अनलॉकमध्ये कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मात्र मरेन, कोण म्हणालं असं...

आरोग्य विषयाचा समावेश करावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक माहिती आता लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यामुळे कोरोनाच नाही तर इतर रोगांपासून दूर जाता येणे शक्‍य होईल. त्यासाठी अभ्यासक्रमातच आरोग्य विषयाचा समावेश करावा, अशी सूचना गोपाल बोहरे यांनी केली. त्यात आहारापासून तर स्वच्छतेपर्यंतचा समावेश करावा असेही ते म्हणाले.

आपणही कळवा आपले मत

शाळा सुरू कराव्यात का? आपल्याला काय वाटते? याबाबत आपले काय मत आहे. खालील व्हॉट्‌स ऍप नंबरवर आपल्या नावासह जरूर कळवा. व्हॉट्‌स ऍप नंबर- 9850209945


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No education losses of students, said former chairman of NMC education committee