ये रे ये रे पावसा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मॉन्सूनला जोर नसल्यामुळे सध्यातरी दमदार पावसाची शक्‍यता कमीच आहे. हवामान विभागानेही जोरदार पावसासाठी अनुकूल "सिस्टीम' बनली नसल्याचे सांगितले.

नागपूर : पावसाने अचानक दांडी मारल्याने उकाडा वाढला आहे. पावसाअभावी सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाही कमालीचा त्रस्त व चिंतित आहे. त्यामुळे प्रत्येकच जण आता वरुणराजाला आर्जव करीत आहेत. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

13 जूनला मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने काही दिवस नियमितपणे नागपूर व विदर्भात हजेरी लावली. 25 जूनच्या मध्यरात्री शहरात मेघगर्जनेसह 60 मिलिमीटर पाऊस बरसला होता. तेव्हापासून पाऊस गायब झाला. आभाळ भरून येते. परंतु, पावसाचा थेंबही पडत नाही. त्यामुळे कमाल तापमान वाढून 35 अंशांवर गेले.

परिणामत: असह्य उकाडा, अवस्वस्थता व चिडचिड जाणवू लागली आहे. गेल्या एक-दोन दिवसांपासून दुपारच्या सुमारास उन्हाचे सौम्य चटके बसताहेत. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना पुन्हा कूलर व एसी सुरू करावे लागले. हवामान विभागाने शनिवारी व रविवारी विदर्भात वादळी पावसाचाही इशारा दिलेला होता. दुर्दैवाने तो इशारादेखील फोल ठरला.

मॉन्सूनला जोर नसल्यामुळे सध्यातरी दमदार पावसाची शक्‍यता कमीच आहे. हवामान विभागानेही जोरदार पावसासाठी अनुकूल "सिस्टीम' बनली नसल्याचे सांगितले. या आठवड्यात जोरदार पाऊस अपेक्षित नसला तरी, काही ठिकाणी हलक्‍या सरींची दाट शक्‍यता आहे. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना ब्रेक लागला आहे. नागपूर व अन्य एक-दोन जिल्ह्यांचा अपवादवगळता, बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षेप्रमाणे कमी पडलेला आहे. आणखी दोन-चार दिवस पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकणार आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजासाठी ही निश्‍चितच धोक्‍याची घंटा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no rain frustrate farmer