नागपुरात जीएसटी विरोधात बंदचा फज्जा; कॅट अध्यक्षांची ‘होम पिच'वरच गोची

abc
abc

नागपूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याचे सरलीकरण व्हावे या मागणीसाठी आज अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी देशव्यापी बंद पुकारला होता. मात्र, त्यांच्या होम पिचवरच म्हणजे नागपूर शहरातच बंदचा फज्जा उडाल्याने त्यांची गोची झाली. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर स्थानिक व्यापाऱ्यांचा विश्वास उडाला का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कॅटने जीएसटी विरोधात देशव्यापी बंद पुकारण्यासाठी या महिन्याच्या प्रारंभीच शहरात देशातील प्रमुख व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला स्थानिक व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तेव्हाच ‘होम पिच'वर बंदच्या यशस्वितेबद्दल शंका उपस्थित केल्या गेली होती.

बंदच्या दिवशी ती प्रत्यक्ष कृतीतून व्यापाऱ्यांनी दाखवून दिली. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी, सराफा बाजार, किराणा ओळ, गांधी बाग, कपडा मार्केट, दवा बाजार, महाल, सक्करदरा, धरमपेठ, सीताबर्डी, सदर, मंगळवारी, खामला या बाजारातील दुकाने सुरू होती. काही व्यापाऱ्यांची दुकाने साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बंद होती, तेवढी दुकानांचे शटर फक्त बंद दिसत होते.

मागील पंधरा दिवसापासून राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉटअपसह इतर समाज माध्यमांच्या साहाय्याने २६ फेब्रुवारीला बंद असल्याने कळवीत होते. मात्र, स्थानिक व्यापारी संघटनांना विश्वासात अथवा त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तसदी घेतली नाही. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनीही बंदला समर्थन केले. त्यांच्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दुकाने सुरू होती. त्यामुळे चेंबरच्या अध्यक्षावरही व्यापाऱ्यांचा विश्वास संपला का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी द नागपूर होलसेल होजियरी ॲण्ड रेडिमेड गारमेंट मर्चंट वेलफेअर असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांसह जीएसटीच्या विरोधात आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करताना अंतराच्या नियमाचा फज्जा उडवीत निदर्शने केली. त्यात एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतलासह इतरही पदाधिकारी सहभागी झाले होते. चेंबरने बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असे प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

कॅटने जीएसटीच्या विरोधात देशव्यापी व्यापार बंदचे आयोजन केले आहे हे फक्त माध्यमातून व सोशल मीडियातून कळाले. साधी चर्चा करण्याचे औचित्यही त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविले नाही. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स विशिष्ट लोकांची संघटना झालेली आहे. त्यामुळे आम्हाला बंद बद्दल काहीही सूचना नसल्याने आमच्या संघटनेने बाजारपेठा सुरू ठेवल्या.
-शिवसिह, 
सचिव नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशन

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com