लक्ष्मी नंतर आता बाजारात आला `औरत बॉम्ब'; बच्चे कंपनीत दिवाळीचा प्रचंड उत्साह 

योगेश बरवड
Wednesday, 11 November 2020

 दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची बाजारपेठ सजली आहे. देवतांचे फोटो असणारे फटाके फोडण्यास होणारा विरोध लक्षात घेता यंदा ‘औरत बॉम्ब' बाजारात आला आहे. पण, ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने फटाके विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागपूर :  दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची बाजारपेठ सजली आहे. देवतांचे फोटो असणारे फटाके फोडण्यास होणारा विरोध लक्षात घेता यंदा ‘औरत बॉम्ब' बाजारात आला आहे. पण, ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने फटाके विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

प्रकाशपर्वावर दिव्यांची आरास आणि आतषबाजी हे अतूट समीकरण आहे. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात फटाके बंदीच्या हालचालींची चर्चा सुरू होती. हा - ना करीत अखेर फटाक्यांची दुकाने सजू लागली आहेत. विक्रेत्यांनी नवीन माल खरेदी करण्याचा मोह टाळून गतवर्षीच्या वाचलेल्या मालावरच व्यवसाय करण्याचा पवित्रा घेतला आहे. 

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'

पर्यावरण प्रेमींकडूनही फटाके न फोडण्याचे आवाहन सुजाण नागरिकांनी मनावर घेतले आहे. मात्र, बच्चे कंपनीच्या आग्रहाखातर काही प्रमाणात फटाके विक्री सुरू आहे. पुढील चार दिवसात फटाके विक्रीला वेग येईल, असा विश्वास तुळशीबाग येथील फटाकेविक्रेत्यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर जुनेच फटाके असल्याने यंदा दरातील वाढ टाळण्यात आल्याचे ईश्वरनगर चौकातील विक्रेते गणेश लोहबरे यांनी सांगितले.

घरोघरी जाऊन विक्रीचा ट्रेंड

यंदा फटाक्यांच्या दुकानांना परवानगी मिळेल की नाही याबाबतची साशंकता होती. यामुळे वाचलेला माल तरी विकला जावा या हेतूने विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यापूर्वीच घरोघरी जाऊन फटाके विक्री सुरू केली. काही भागांमध्ये अजूनही हाच ट्रेंड दिसून येतो. अधिक डबे घेतल्यास मोठी सूट देऊ करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

शिवसेनेचा विरोध

शिवसेनेने लक्ष्मी व गणेशाचे फोटो असलेले फटाक्यांची विक्री व ते फोडण्याला विरोध दर्शविला आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख दीपक पोहनेकर यांच्या नेतृत्वात यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींना निवेदन देण्यात आले. म्हाळगीनगर चौकात मूक निदर्शने करीत शिवसैनिकांनी जनजागृतीचाही प्रयत्न केला.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now Aurat bomb is introduced in fire crackers market