आता ‘सुपर’मध्ये फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रयत्न; मेडिकल-सुपरचा पुढाकार

केवल जीवनतारे
Thursday, 28 January 2021

सुपरमध्ये किडनी प्रत्यारोपणातून ६६ जणांचे जीव वाचविले आहेत. यासाठी अद्ययावत असे शस्त्रक्रियागार उभारले आहे. यात प्रत्यारोपण युनिटमध्ये काही बदल करून हृदय प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रियागार वापरता येते.

नागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच हृदय प्रत्यारोपण केंद्राला मंजुरी मिळाली. यापूर्वी फुफ्फुसाच्या आजाराच्या रुग्णांवर अद्ययावत उपचार व संशोधनासाठी ६०० कोटी खर्चून फुफ्फुस संशोधन संस्था (लंग्स इन्स्टिट्यूट) उभारण्यात येणार होती. मात्र, हा प्रस्ताव बारगळला. यामुळे सुपरमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण युनिट उभारण्याकडे प्रशासनाचा कल दिसून येत आहे. या युनिटसाठी परवानगीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

मध्य भारतातील हृदय, फुफ्फुस तसेच यकृताच्या रुग्णांची गरज बघता सुपरमध्ये हृदयासह इतरही अवयवांचे प्रत्यारोपण करण्यास परवानगीसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. शासनाकडे फुप्फुस प्रत्यारोपण युनिटसाठी प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून फुफ्फुस प्रत्यारोपण युनिट उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

नक्की वाचा - ...अन् पंचेचाळीस वर्षीय इसम कोर्ट परिसरातून आरडा-ओरड करीत बाहेर पडला

सुपरमध्ये किडनी प्रत्यारोपणातून ६६ जणांचे जीव वाचविले आहेत. यासाठी अद्ययावत असे शस्त्रक्रियागार उभारले आहे. यात प्रत्यारोपण युनिटमध्ये काही बदल करून हृदय प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रियागार वापरता येते. त्याचप्रमाणे चार ते पाच कोटीच्या यंत्रसामुग्रीतून फुफ्फुस प्रत्यारोपण केंद्र सहज उभारता येते. यामुळेच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी कायदेशीर प्रक्रिया करीत हृदय प्रत्यारोपणाला मंजुरी मिळवली आहे.

लाखामध्ये १२७ लोकांचा मृत्यू फुफ्फुसाशी संबंधित आजाराने
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात एक लाख लोकांमध्ये १२७ लोकांचा मृत्यू फुफ्फुसाशी संबंधित आजाराने होतो. छत्तीसगड, तेलंगण, मध्यप्रदेशातूनही फुफ्फुसाशी संबंधित रुग्ण मोठ्या संख्येने येतात. मेडिकलमध्ये दरवर्षी फुफ्फुसाच्या सुमारे १०० कॅन्सरग्रस्तांची नोंद होते. या रुग्णांना फुफ्फुस प्रत्यारोपणातून जीवनदान मिळू शकते.
- डॉ. सुशांत मेश्राम,
विभागप्रमुख, श्वसनरोग, मेडिकल-सुपर नागपूर

अधिक माहितीसाठी - गुप्तधन, तिलिस्मी औषध शोधण्यासाठी शेतात जमले नागरिक; सोबत होता हा दुर्मिळ प्राणी

तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा देण्याचा शब्द दिला
मेडिकलमध्ये हृदय प्रत्यारोपण विभागाला मंजुरी मिळाली. हृदय प्रत्यारोपण युनिट वर्षभरात होईल. पूर्वी लंग्स इन्स्टिट्यूट तयार करण्यात येणार होते. आता लंग्स ट्रान्सप्लान्ट युनिट उभारण्यावर भर देण्यात येत आहे. या मातृसंस्थेत शिकलेल्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी येथे सेवा देण्याचा शब्द दिला आहे. याचा लाभ रुग्णांना होईल.
- डॉ. सजल मित्रा,
अधिष्ठाता, मेडिकल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now try for a lung transplant in Super hospital Nagpur super hospital news