‘चेकमेट’साठी सत्तापक्षनेता हा फडणवीस गटाचाच! ओबीसी नगरसेवकाच्या गळ्यात जाणार माळ?
नागपूर : भाजपने नवा महापौर दिल्याने आता सत्तापक्ष नेताही बदलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी काही अनुभवी आणि चांगला तसेच अभ्यासपूर्ण युक्तिवाद करणाऱ्या नगरसेवकांची चाचपणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्याच दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाचे नाव पक्के झाल्याचे समजते.
सुमारे दहा वर्षांपासून भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक तसेच नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सभोवताल महापालिकेचा कारभार सुरू होता. दटके, जोशी आणि तिवारी हे तिघेही महापालिकेत सत्तापक्ष नेते होते. माजी महापौर दटके आता आमदार झाले आहेत. जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे तर तिवारी आता स्वतः महापौर आहेत.
आगामी वर्षे निवडणुकीचे असल्याने विरोधक आक्रमक होणार आहे. महापालिकांच्या सभेत आरोप-प्रत्यारोपही होणार आहे. वास्तविक महापौर तिवारी डिबेटर्स आहेत. युक्तिवादात त्यांना पराभव करणे अवघडच! अनुभव आणि भाषेच्या बळावर समोरच्यांना नामोहरम करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. मात्र, महापौर असल्याने त्यांच्या बोलवण्यावर मर्यादा येणार आहेत.
आरोप-प्रत्यारोप ऐकून अंतिम आदेश देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. तत्पूर्वी, सभागृहातील चर्चेदरम्यान विरोधकांना आवरण्याचे, त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम प्रामुख्याने सत्तापक्ष नेत्याला करावे लागते. त्यादृष्टीने तसेच आगामी निवडणुकीसाठी ओबीसी नगरसेवकाची सत्तापक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कळते.
उघड नसली तरी आतून गटबाजी
भाजपत उघडपणे गटबाजी नाही. मात्र, नाही म्हटले तरी फडणवीस आणि गडकरी असे दोन गट शहरात पडल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून हे ठसठशीतपणे कार्यकर्त्यांनासुद्धा जाणवू लागले आहे. संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना सव्वा-सव्वा वर्षाचे महापौरपद वाटून देणे आणि त्याची आधीच घोषणा करणे हा त्याचाच एक भाग होता. दयाशंकर तिवारी ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश गडकरी गटातच केला जातो. त्यामुळे ‘चेकमेट’साठी सत्तापक्षनेता हा फडणवीस गटाचाच राहणार असल्याचे बोलले जाते.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.