सत्तेतील भागीदारानेच केला काँग्रेसचा ‘गेम’; शिवसेनेकडून खिंडार

राजेश प्रायकर
Monday, 12 October 2020

दीपक कापसे यांनी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडली. ते अखिल भारतीय काँग्रेसचे निमंत्रित सदस्य तसेच प्रदेश काँग्रेसचे काही काळ महासचिवही होते. नाना झोडे शहर काँग्रेसचे महासचिव आहेत. दीपक कापसे यांच्या सेनेतील प्रवेशामुळे दक्षिण नागपुरातील काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे.

नागपूर : राज्यातील शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसला शहरात शिवसेनेने खिंडार पाडले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक असलेल्या दोन माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रदेश काँग्रेसचे माजी महासचिव दीपक कापसे व शहर काँग्रेसचे महासचिव नाना झोडे या मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे सत्तेतील भागीदारानेच काँग्रेसचा ‘गेम’ केल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.

शहर काँग्रेसमधील अडगळीत पडलेल्या अनेकांत राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थता दिसून येत आहे. ही संधी साधत माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी अस्वस्थ काँग्रेस नेत्यांना सेनेत येण्याचे आमंत्रण दिले. दक्षिण नागपुरातील माजी नगरसेवक दीपक कापसे, पूर्व नागपुरातील माजी नगरसेवक नाना झोडे यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला.

अधिक माहितीसाठी - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

दीपक कापसे यांनी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडली. ते अखिल भारतीय काँग्रेसचे निमंत्रित सदस्य तसेच प्रदेश काँग्रेसचे काही काळ महासचिवही होते. नाना झोडे शहर काँग्रेसचे महासचिव आहेत. दीपक कापसे यांच्या सेनेतील प्रवेशामुळे दक्षिण नागपुरातील काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. कापसे व झोडे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक आहे.

या दोघांसह माजी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांचे पती श्रीकांत कैकाडे, अंकुश भोवते, विष्णू बनपेला, अविनाश मैनानी, रमेश अंबरते, गंगाधर गुप्ता या काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यांनीही सेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह भीम आर्मीचे हरीश रामटेके, भाजपा झोपडपट्‍टी सेलचे माजी उपाध्यक्ष सुधाकर वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेनेत प्रवेश केला.

ठळक बातमी - दोन्ही मुले ढसा ढसा रडत म्हणाले, ‘मम्मीऽऽ मम्मी पप्पाला काय झालं, ते कधी येणार’

चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, निर्मल-उज्ज्वल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे, विशाल बरबटे, बंडू तळवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The office bearers along with two former corporators joined Shiv Sena