नागपूर महापालिकेचे अधिकारी सायकलने पोहोचले कार्यालयात; महिन्यातून एक दिवस येणार सायकलने 

मंगेश गोमासे  
Wednesday, 2 December 2020

राम जोशी हे हिंगणा टी-पॉइंटजवळ आपल्या घरातून आले. तर संजय निपाणे आपल्या सायकलने रामनगर येथून आले. जलज शर्मा आणि श्रीमती भुवनेश्वरी एस. हेसुद्धा आपल्या घरातून आकाशवाणी चौकात सायकलने आले. 

नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायकलने मनपा मुख्यालयात पोहोचले. त्याचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि संजय निपाणे यांनी केले. इंधनावर चालणारी वाहने टाळून शहरात प्रदूषण कमी करण्यात मनपाने अशाप्रकारे आपले योगदान दिले.

अधिक वाचा - लॉकडाउनदरम्यान घरांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंग, सोनोग्राफी चाचण्यांमध्ये घट 

राम जोशी हे हिंगणा टी-पॉइंटजवळ आपल्या घरातून आले. तर संजय निपाणे आपल्या सायकलने रामनगर येथून आले. जलज शर्मा आणि श्रीमती भुवनेश्वरी एस. हेसुद्धा आपल्या घरातून आकाशवाणी चौकात सायकलने आले. 

या मोहिमेत उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गणवीर, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, महासचिव रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रदीप तंत्रपाळे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन हे बेसा येथून सायकलने आले.

क्लिक करा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर! 

जलज शर्मा यांनी सांगितले की, नागपुरात वायु प्रदुषणचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाच्या निमित्ताने सायकलीने मनपा कार्यालयामध्ये येणे याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मनपा अधिकारी व कर्मचारी प्रत्येक महिन्यातून एकदा सायकलने कार्यालयात यावे, असे आवाहन राम जोशी यांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers of Nagpur NMC are reached office on Cycle