पहाडीवर कब्जा करणाऱ्यांचे धाबे दणाणले; कुंभकर्णी झोपेत असलेले अधिकारी झाले जागे 

सहदेव बोरकर 
Saturday, 24 October 2020

सोंड्या पहाडीवर अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. यात मौल्यवान वृक्षांची कत्तल केली जात आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यात काम करणाऱ्या कामगार संकटात येण्याची शक्‍यता आहे,

सिहोरा (जि. भंडारा)  : सोंड्या प्रकल्पाच्या पाळीवर भूमापन यांचा कब्जा ही बातमी वृत्तपत्रात झळकताच पहाडीवर कब्जा करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महसूल, खाण व वन विभागाचे अधिकारी जागे झाले. त्यामुळे सोंड्या पहाडीवर अवैध उत्खनन बंद करण्यात आले आहे.

सोंड्या पहाडीवर अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. यात मौल्यवान वृक्षांची कत्तल केली जात आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यात काम करणाऱ्या कामगार संकटात येण्याची शक्‍यता आहे, असा ठपका अधिकाऱ्यांवर ठेवला होता. या पहाडी वरून दररोज पाच ते सात ट्रीपच्या जवळ अवैध उत्खनन केले जात आहे. त्याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

अधिक वाचा - VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक

ज्या पत्थरफोड खाणीवर कामगार काम करीत होते. ती खाण सोंड्या पहाडीच्या पायथ्याशी असून खाण खचून धोका होण्याची शक्‍यता आहे. खाणीत काम करणाऱ्या कामगारांना या खाणीचा अधिकृत मालक कोण? ही खाण कोणाच्या ताब्यात आहे? हे सांगायला कामगार तयार नाहीत. ज्या जागेवर ही खाण आहे, त्यात जागेचा गट क्रमांक 368 असून तो 10 हेक्‍टरचा लांब पट्टा आहे. 

दिल्ली संधान केंद्राकडून पत्थरपहाड म्हणून घोषित केले आहे. या जागेपैकी पाच हेक्‍टर जागा काही दिवसांपूर्वी लांजेवार व कटारे कंत्राटदार यांच्या ताब्यात लीजवर देण्यात आली होती. यात पाच हेक्‍टर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असून सध्या ती मोकळी आहे. सध्या ती जागा कोणालाही लीजवर दिली नाही.

ज्या पहाडीवर अवैध उत्खनन केले जात आहे. ते भूमाफिया कोण? असा प्रश्न होता. यात शासकीय विभागांचे अधिकारीच सहभागी नाही, असा संशय होता. याबाबत बातमी झळकताच अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी अवैध सुरू असलेली खाण बंद केली, असे तलाठी कार्यालयाकडून सांगितले गेले. अधिकाऱ्याच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

सोंड्या पहाडीवर कामगारांनी काम करणे बंद केले आहे. कोरोना काळात रोजगार नाही, म्हणून आम्ही हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे खोदकाम करू नये, केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल अशी समज दिल्याने काम बंद केले आहे.
- भोजराम कुंभारे 
तलाठी, टेमनी साजा क्रमांक9 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: officers restricted people who wants to occupy sondya hill